Breaking

रविवार, १३ जुलै, २०२५

"संतुलित व गुणवत्तापूर्ण लोकसंख्येच्या माध्यमातून बलशाली भारताची उभारणी शक्य" : प्रा. डॉ. प्रभाकर माने यांचे प्रतिपादन


जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर,प्रा.डॉ. संदीप रावळ व प्रा. योगेश बदामे 


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : “भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात शाश्वत विकास व बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी संतुलित व गुणवत्तापूर्ण लोकसंख्येची नितांत आवश्यकता आहे,” असे स्पष्ट मत प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी मांडले. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून येथील जी.के.जी. कन्या घोडावत महाविद्यालयात दिनांक ११ जुलै २०२५ रोजी अर्थशास्त्र व भूगोलशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर होते.

  प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी जागतिक आणि भारतीय लोकसंख्येचा सविस्तर आढावा घेताना लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम आणि उपाय यांची सखोल मांडणी केली. “सरकारच्या ठोस लोकसंख्या धोरणाच्या अभावामुळे लोकसंख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. ही स्थिती देशाच्या शाश्वत विकासात मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले,  बलशाली  राष्ट्र उभारणीसाठी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांनी कार्यरत राहावे.”

   प्राचार्य डॉ. विकास मिणचेकर यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, “देशाचा सर्वांगीण विकास हा समतोल पद्धतीने व्हायला हवा. जर लोकसंख्या अडसर ठरत असेल, तर त्यावर उपाय शोधणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

     अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप रावळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून  प्रास्ताविकेच्या माध्यमातून आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय भूगोलशास्त्र प्रमुख प्रा. योगेश बदामे यांनी करून दिला. आभारप्रदर्शन प्रा.आर्या कुलकर्णी यांनी केले.

       या कार्यक्रमास अर्थशास्त्र व भूगोलशास्त्र विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा