Breaking

रविवार, १३ जुलै, २०२५

जयसिंगपूर कॉलेजमध्ये भव्य जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन


कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : बदलत्या हवामान परिस्थिती व वाढत्या आपत्ती संकटांच्या पार्श्वभूमीवर, नव्या पिढीला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. या सामाजिक भानातून  शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्र, आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जयसिंगपूर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी एक भव्य जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.


     ही कार्यशाळा केवळ सैद्धांतिक मार्गदर्शनापुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील ३०० हून अधिक स्वयंसेवक व संघ व्यवस्थापक यामध्ये सहभागी होणार आहेत. दोन सत्रांमध्ये विभागलेली ही कार्यशाळा मौखिक मार्गदर्शन आणि मॉक ड्रिल प्रात्यक्षिके अशा स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी दिली.

      या उपक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व व्यापक स्वरूपात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम.चौगले, शिव सहायता केंद्राचे प्रमुख डॉ. एस.एम. गायकवाड, सुरेखा आडके, आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट प्रतिनिधी रफिक नदाफ उपस्थित राहणार आहेत.

   कार्यशाळेमध्ये जीवरक्षक कोल्हापूरचे दिनकर कांबळे, समुपदेशक सत्यजित देसाई, यशोदर्शन फाउंडेशनचे योगेश अग्रवाल, सांगली येथील NDRF पथक आणि जयसिंगपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जयसिंगपूर कॉलेजचे संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. एक उच्च दर्जाचा शिक्षणात्मक अनुभव ठरणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी दिली.

    या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, कार्यालय अधीक्षक संजय चावरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. के.डी. खळदकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा