Breaking

रविवार, ६ जुलै, २०२५

*प्रा.डॉ.महावीर बुरसे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*


प्रा.डॉ. महावीर बुरसे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर चे पर्यवेक्षक प्रा.डॉ.महावीर बुरसे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पद्मश्री मा.पोपटराव पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.हा  पुरस्कार समारंभ बी.द.चेंज फाउंडेशन,शिर्डी, अहिल्यानगर यांच्या वतीने २९ जून, २०२५ रोजी शिर्डी येथे संपन्न झाला.

        डॉ. महावीर बुरसे हे सध्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे ज्युनिअर विभागाचे कार्यशील पर्यवेक्षक म्हणून ती कार्यरत आहेत. जु कॉलेजमध्ये सहाय्यक शिक्षक असूनही त्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली.डॉ.बुरसे हे प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाल्यापासून ते आज तागायत विद्यार्थी घटक हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहेत. डॉ. महावीर यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक प्रयोग राबवित आहेत. निबंध, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धा अश्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी हा गुणवंत बनण्यासाठी  जादा तासिकेच्या माध्यमातून अध्यापनाचा कार्य केलं. सेवा हे व्रत मानून त्यांनी विद्यार्थी व समाजाच्या हितासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी नवोपक्रमाचा आधार घेतला होता. विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यामध्ये नातेसंबंध जोडण्यासाठी पालक मेळावा च्या माध्यमातून उत्तम संवाद व समन्वय साधण्यात ते यशस्वी झाले आहेत. विद्यार्थी हे अधिक गतीक्षम, ज्ञानवान, कीर्तीवान होण्यासाठी ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा आधार घेतला.ई कंटेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा अधिक प्रयत्न केला.

     डॉ. बुरसे हे समतावादी विचारांचे पुरस्कर्ते असून ते सातत्याने भारतीय संविधानाला अनुसरून वैचारिक अंमलबजावणी करीत आहेत. त्यांचे ४ ग्रंथ प्रकाशित झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. भूगोल या विषयाच्या ११ व १२ वी वर्गाचे पाठ्यपुस्तकाचं लेखन केले आहे. तसेच जय हिंद न्यूज नेटवर्क चे ते उपसंपादक असून असंख्य शैक्षणिक व सामाजिक बातम्या प्रसारित करून विविध विषयावरील लेखन कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. समाजातील वंचित घटकांचे विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च उचलले आहेत. तसेच झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग चालवीत असून त्यांना संस्कारक्षम करण्याचा विडा उचलला आहे. विद्यार्थ्यासाठी भूगोल विषयातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.

       प्रा.डॉ.बुरसे यांना या अगोदरही कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व व राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन झाले होते.ते जयसिंगपूर कॉलेजच्या नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार आहेत. जयसिंगपुरातील सुप्रसिद्ध अशा सामाजिक कार्य करणाऱ्या सर्कल ग्रुपचे अध्यक्ष म्हणून उत्तम धुरा सांभाळतात.त्यांचे व्यक्तिमत्व हे आदर्शवत असून इतरांना त्याचा निश्चितच लाभ होतो. प्रभावी व अभ्यासू प्राध्यापक म्हणून ते जयसिंगपूर पंचक्रोशीत लोकप्रिय आहेत. स्वच्छता व स्वयंशिस्त,सहकार्याची भावना व अजातशत्रू ही त्यांच्या स्वभावाची गुणधर्म आहेत.

     त्यांच्या या पुरस्कारामध्ये त्यांची  आई -वडील जयकुमार, त्यांची पत्नी प्रा. ज्योति बुरसे, सर्व गुरुवर्य, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सन्माननीय संचालक, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व कॉलेजच्या इतर सर्व घटकांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा