![]() |
ज्येष्ठ विचारवंत व अर्थशास्त्र कालवश प्रा.डॉ.जे.एफ.पाटील |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
प्रमुख, अर्थशास्त्र विभाग
जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर (९८२३१२००७६)
कालवश प्रा. डॉ. जे. एफ. पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत अर्थतज्ज्ञ, समाजतज्ज्ञ, आदर्श शिक्षक व प्रतिभावंत लेखक म्हणून सर्वपरिचित होते. त्यांनी दीर्घकाळ शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागात विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकार, कृषी विकास, बँकिंग व आर्थिक धोरण या विषयांवर सखोल संशोधन त्यांनी अनेक शैक्षणिक प्रबंध, संशोधनपर लेख व उत्कृष्ट पुस्तकांचे लेखन तसेच संपादकीय कार्य केले. ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकार चळवळीतील प्रश्नांवर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विविध शासकीय व अशासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणूनही त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवताना त्यांनी वास्तवाशी जोडलेले, सोपे व परिणामकारक अध्यापन केले. शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन (सुयेक संघटना) चे ते संस्थापक अध्यक्ष होते. समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या माध्यमातून विज्ञानवादी, विवेकवादी व समाजवादी कार्यकर्त्यांची फौज घडविण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
भारतीय संविधानाला सर्वोच्च मानून त्यांनी सार्वजनिक व खाजगी जीवनात त्याची तत्त्वे अंगीकारली. महाराष्ट्र नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी सुचविलेल्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती मिळाली. वंचित घटकाला न्याय देणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.डॉ. पाटील हे नाव घेतल्यावर असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात आदर, आपुलकी आणि प्रेरणेची भावना जागृत होते. त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी पीएच.डी. व एम.फिल. पदव्या संपादन केल्या. केवळ पदवी मिळविण्यापुरतेच नव्हे, तर त्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावली. शिक्षणात गुणवत्ता, संशोधनात प्रामाणिकता आणि कार्यात सातत्य या त्रिसूत्रीवर त्यांनी सदैव भर दिला.
स्थानिक संशोधनाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष अधोरेखित करावा लागेल. अर्थशास्त्र मराठी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी संशोधनात्मक लेखनाची चळवळ उभारली. स्थानिक संशोधकांचे प्रोत्साहन, नवोदित लेखकांना प्रेरणा आणि संशोधनात्मक विचारांना व्यासपीठ ही त्यांची मोठी देणगी ठरली. वृत्तपत्रीय लेखन ही त्यांची आणखी एक ओळख होती. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी लेखणी हातातून सोडली नाही; सामाजिक प्रश्न असोत किंवा शैक्षणिक धोरणे, त्यांनी आपल्या ठाम व अभ्यासपूर्ण लिखाणातून समाजाला दिशा दिली.
संघटनात्मक कार्यातही त्यांचा हातखंडा होता. मराठी अर्थशास्त्र परिषद असो वा सुयेक संघटना, या कार्याला गती देण्यासाठी त्यांनी असंख्य प्राध्यापक व संशोधकांना जोडले. संशोधनाची संस्कृती विद्यापीठापुरती मर्यादित न ठेवता, ती गावागावात, समाजाच्या तळागाळात पोहोचावी, असा त्यांचा कटाक्ष होता.
डॉ. पाटील यांचे व्यक्तिमत्व सह्याद्री पर्वतासारखे कणखर होते. खड्या पण प्रभावी आवाजात त्यांनी आपले विचार मांडले. साधी राहणी, उच्च विचार, वैचारिक प्रगल्भता, प्रामाणिकता व नेतृत्वगुण ही त्यांची खरी ओळख होती. म्हणूनच विद्यार्थी व प्राध्यापक त्यांना आपला गुरु मानून त्यांच्याकडे आकर्षित होत असत.
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांमधून त्यांनी अर्थशास्त्र व सामाजिक शास्त्रांवरील अनेक प्रश्नांवर विचारमंथन केले. महाराष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाची भक्कम पायाभरणी व्हावी, यासाठी ते आचार्य शांताराम बापू गरुड आणि प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या बरोबरीने कार्यरत होते. गावोगावी वैज्ञानिक दृष्टिकोनाची केंद्रे निर्माण व्हावीत, समाजामध्ये विवेकनिष्ठा व संशोधनशीलता वाढावी, हा त्यांचा जीवनदृष्टीकोन होता. प्रसिद्ध वक्ते लेखक व संपादक प्रसाद कुलकर्णी यांच्या मदतीने प्रबोधिनीची चळवळ विस्तारण्याचा प्रयत्न केला.
प्रा. डॉ. पाटील यांच्या कार्याचा विचार करताना सर्वप्रथम त्यांच्या बालपणी आई-वडिलांनी दिलेले संस्कार लक्षात घेतले पाहिजेत. हे संस्कारच त्यांना समाजहितासाठी प्रेरित करीत राहिले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेची शिकवण, महात्मा गांधींच्या अहिंसेचे व सत्याग्रहाचे तत्वज्ञान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची प्रेरणा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतिशील धोरणांचा गाढा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीवर स्पष्टपणे उमटलेला दिसतो.शिवाजी विद्यापीठ या कार्यक्षेत्रात त्यांनी अर्थशास्त्र विषयाच्या सखोल अभ्यासाला एक सामाजिक व ऐतिहासिक दिशा दिली. केवळ सैद्धांतिक लेखनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी समाजासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या महापुरुषांच्या जीवनातील कृतिशील अर्थकारणाचे शैक्षणिक स्वरूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
विशेषतः एम.ए. अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागासाठी त्यांनी छ. शाहू महाराजांच्या अर्थशास्त्रीय कर्तृत्वाचा अभ्यासक्रमात समावेश केला. यामागे त्यांचा स्पष्ट हेतू असा होता की, अर्थशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ ग्रंथातील आकडे, सिद्धांत व मांडणी यापुरते मर्यादित न राहता, समाजपरिवर्तन करणाऱ्या कृतिशील अर्थकारणाचा अभ्यास करून समाजहितासाठी प्रत्यक्ष कार्य करावे.ही दृष्टी त्यांच्या महापुरुषांविषयी असलेल्या गाढ श्रद्धेतून व आत्मीयतेतून जन्माला आलेली होती. केवळ अभ्यासक्रम तयार करण्यापुरतेच नव्हे, तर त्यामागे सामाजिक जबाबदारी, कृतिशीलतेची जाणीव व मूल्याधिष्ठित शिक्षणाचे ध्येय प्रकट होत होते.
प्रा. डॉ. पाटील यांचे कार्य हे एका शैक्षणिक परंपरेपलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तनाचे साधन ठरते. महापुरुषांच्या शिकवणीशी, त्यांच्या जीवनमूल्यांशी आणि त्यांच्या कर्तृत्वाशी विद्यापीठ शिक्षणाची नाळ जोडण्याचे काम त्यांनी केले. हाच त्यांच्या कार्याचा अद्वितीय ठेवा आहे, ज्यातून आजही भावी पिढ्या प्रेरणा घेत आहेत.
डॉ. पाटील यांच्या कार्याची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी कधीही आपल्या पदाचा किंवा सन्मानाचा अहंकार केला नाही. कितीही सामाजिक व शैक्षणिक पदे भूषविली तरी साधेपणा आणि आत्मीयता या दोन गुणांनी ते सदैव ओतप्रोत राहिले.त्यांचे संपूर्ण आयुष्य ही सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधनात्मक चळवळीला वाहून घेतलेली एक प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या ध्येयवेड्या वृत्तीमुळे ते एक युगप्रवर्तक प्राध्यापक म्हणून सदैव स्मरणात राहतील. अशा या कृतिशील आणि ध्येयदृढ व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन! त्यांच्या उदात्त वैचारिक कृतिशील कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे नेणे, हाच त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थाने सन्मान ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा