![]() |
आरोपीसह जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व गुन्हे शोध पथक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर (ता. शिरोळ) : चिपरी गावात एका युवकाचा कोयत्याने खून झाल्यानंतर अवघ्या ६ तासांत जयसिंगपूर पोलिसांनी शिताफीने तिघा आरोपींना चिक्कोडी, राज्य कर्नाटक येथून ताब्यात घेतले.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ०८.४५ वाजण्याच्या सुमारास चिपरी गावातील घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिलच्या मध्ये असलेल्या रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके (रा. माळभाग, चिपरी) याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी त्याच्या काकांनी — भगवान आण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा रजि. नं. ३२६/२०२५ भा.दं.वि. कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा घडल्यानंतर जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून चिक्कोडी (राज्य कर्नाटक) येथे तिघा संशयित आरोपींचा माग काढण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सत्यवान हाके, सहा. पो.नि. दिपक कदम, पो.उप.नि. प्रवीण माने, अंमलदार बाळासाहेब गुत्ते कोळी, रुपेश कोळी, जावेद पठाण, युनुस इनामदार, किशोर अंबुडकर, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, रहिमान शेख यांच्या पथकाने अवघ्या ६ तासांत चिक्कोडी परिसरात सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये निष्पन्न आरोपी १. युवराज रावसाहेब माळी (रा. फिल्टर हाऊसजवळ, चिपरी) २. सुरज बाबासो डाले (रा. खोची, ता. हातकणंगले ३. गणेश संभाजी माळी (रा. माळभाग, चिपरी)
खुनामागील कारण आरोपी युवराज माळी याने चौकशीत सांगितले की, मृत संदेश शेळके याची बहीण ही आपल्या आईविषयी अपशब्द वापरत असल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातूनच युवराज व त्याच्या दोन साथीदारांनी खून घडवून आणला. त्यांनी संदेशला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने घोडावत परिसरात नेले आणि तिथे युवराजने कोयत्याने सपासप वार करून खून केला. नंतर हे तिघे आरोपी मोटरसायकलवरून चिक्कोडीला पळून गेले.
सध्या या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गुन्हे अन्वेषण पथक काम करत आहे. काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या होत्या.या उत्कृष्ट कारवाईमुळे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा