Breaking

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

*जयसिंगपुरात मोकाट कुत्र्यांचा दहशत : जमादार यांच्यावर झुंडीचा हल्ला, गंभीर जखमी*


जयसिंगपूर शहरातील कुत्र्यांच्या झुंडी

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत असून, अखेर त्याचा गंभीर परिणाम समोर आला आहे. नांदणी रोडवरून जात असताना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अन्वर जमादार (वय ५०) यांच्यावर तब्बल १५ हून अधिक कुत्र्यांच्या झुंडीने भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही पाय, मांडी व पोट याठिकाणी लचके तोडून गंभीर जखमी करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन कुत्र्यांना हाकलून जखमी जमादार यांना तत्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.

   या घटनेनंतर जयसिंगपूर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मच्छी मार्केट परिसरात फेकल्या जाणाऱ्या मटन, चिकन व माशांच्या वेस्टेजमुळे ५०० हून अधिक कुत्री येथे फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. १५ ते २० कुत्र्यांच्या झुंडी एकत्र फिरत असून, नागरिकांवर अचानक हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

  नागरिकांना सकाळ-संध्याकाळ घराबाहेर निघताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. विशेषतः एकटे-दुकटे फिरणाऱ्यांवर कुत्र्यांच्या झुंडी धाव घेत असल्याने शहरवासीयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.


कुत्र्यांची दहशत असलेली ठिकाणे :

१) मच्छी मार्केट

२) राजीव गांधी नगर

३) छत्रपती संभाजी नगर

४) यादव नगर कॉलेज रस्त्यावर

५) नांदणी रोड

६) कलावती आई/परमार्थ निकेतन मंदिराजवळ

७) बावन झोपडपट्टी

८) शहा पेट्रोल पंपा समोरील परिसर

९) समडोळ मळा

१०) नांदणी नाका

११) सरकारी दवाखान्याच्या मागील झोपडपट्टी

१२) दसरा चौक व शिरोळवाडी रोड 

१३) लक्ष्मी रोड 

१४) मालू हायस्कूल व भाजीपाला मार्केट

     आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा विशेष वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  या गंभीर प्रकारानंतर नागरिकांकडून जयसिंगपूर नगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही, असा संतप्त सवाल शहरवासीयांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा