![]() |
कु. उत्कर्षा उषा उत्तम सुतार स्पर्धा परीक्षा सुयश |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील कु. उत्कर्षा उषा उत्तम सुतार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट–ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवत तिने हेरवाडचे नाव उज्ज्वल केले असून, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात १४ व्या क्रमांकावर आली आहे. या यशामुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक (STI) या पदासाठी झाली आहे.
उत्कर्षाने जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिर हेरवाड व नृसिंहवाडी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. एस.पी. हायस्कूलमध्ये ८वी ते १०वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने संजय घोडावत विद्यापीठात ११वी–१२वी पूर्ण केली. इंजिनियरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्राची वाट निवडून तिने जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात तीन वर्षे घालवल्यानंतर शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तिला दिल्लीत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. तिथे भक्कम पायाभरणी करूनही यूपीएससीत एकदा अपयश आले. मात्र खचून न जाता सातत्याने प्रयत्न करून एमपीएससीत तिने झळाळते यश मिळवले.
तिच्या यशात अनेक गुरुजन, शिक्षक, मार्गदर्शक व परिवाराचा मोठा वाटा असून विशेषतः तिचे आई–वडील उत्तम व उषा सुतार यांचे पाठबळ कायम मिळाले.
जय हिंद न्यूज नेटवर्क शी बोलताना त्या म्हणाल्या, “यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि कष्ट ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. अपयश आल्यावर खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं आहे. माझं अंतिम ध्येय आयएएस अधिकारी होणं आहे.”
उत्कर्षाच्या या यशामुळे हेरवाड गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा