Breaking

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

*जयसिंगपूर नगरपरिषदेच्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद*

            

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन प्रसंगी उपमुख्याधिकारी प्रमिला माने, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी व एन.एस.एस.चे विद्यार्थी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : पर्यावरण संवर्धनाची जपणूक व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन जयसिंगपूर नगरपरिषदेने यंदा गणेश विसर्जनासाठी केलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाला शहरातील गणेशभक्त व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परंपरा, श्रद्धा व पर्यावरणपूरकता यांचा संगम साधणारा हा उपक्रम शहरवासीयांसाठी प्रेरणादायी ठरला.

      यासाठी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या ८ ठिकाणी कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कुंडांची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवक अत्यंत मनोभावे विसर्जनाची प्रक्रिया पार पाडत होते. गणेश मूर्तीचे पावित्र्य अबाधित राहावे, तसेच नद्यांचे प्रदूषण टाळावे यासाठी गेल्या वर्षी काही सामाजिक संघटना व व्यक्तींनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन यंदाही करण्यात आले.

    नगरपरिषदेच्या या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी आणि उपमुख्याधिकारी प्रमिला माने यांनी विविध केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक व्यक्त करताना, “गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम व्हावा, यासाठी नगरपरिषदेचा हा प्रयत्न आहे,” असे सांगितले.

   या उपक्रमामुळे श्रद्धा आणि पर्यावरणपूरकता यांचा समतोल साधला गेला असून, जयसिंगपूर शहराने एक आदर्श घालून दिला आहे. नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग व नगरपरिषदेने पर्यावरणाशी बांधिलकी जोपासली आहे.

   गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा नव्हे तर पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव करून देणारा उत्सव ठरावा, हा जयसिंगपूर नगरपरिषदेचा उपक्रम प्रत्येक शहरासाठी प्रेरणादायी आहे. या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनाच्या (NSS) विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. 

         जयसिंगपूर नगरपरिषदेच्या या पर्यावरणपूर्वक उपक्रमाचे नागरिक व गणेश भक्तांकडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा