![]() |
| महापूर ग्रस्तांना अन्नधान्य मदत |
*अंजली माळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : मराठवाडा आणि सोलापूर परिसरात झालेल्या भीषण महापुरामुळे अनेकांचे घर, शेती व उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) विभाग व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
"मानवतेसाठी मदत – आपत्तीमध्ये एकतेचा हात" या घोषवाक्याखाली एन.एस.एस. स्वयंसेवकांनी मदत निधी संकलन उपक्रम हाती घेतला. अर्थशास्त्र विभाग व एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने धान्य, कपडे, अन्नसाहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे संकलन करून मदत सामग्री तयार केली. संकलित साहित्य शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या नाईट कॉलेज, इचलकरंजी येथील मदत संकलन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. तेथून हे साहित्य विद्यापीठाच्या माध्यमातून महापुरग्रस्त भागांमध्ये पाठवण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले आणि प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर व प्रा. डॉ. प्रभाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. प्रतिनिधी अग्रजा कांबळे व अर्थशास्त्र विभागाच्या शुभांगी कुंभार यांनी हा उपक्रम पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्राचार्य डॉ. मांजरे यांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा