Breaking

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

*“सहकारातून ‘भारत ब्रँड’ उभारणीची गरज : माजी अप्पर आयुक्त आनंद जोगदंड यांचे आवाहन”*

 

 सहकार अप्पर आयुक्त आनंद जोगदंड मार्गदर्शन करताना 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


कोल्हापूर : “सहकारातून भारताचा स्वतंत्र ‘ब्रँड’ निर्माण झाला पाहिजे, यासाठी सहकारी संस्थांनी व्यावसायिक व्यवस्थापन आणि बदलती मानसिकता स्वीकारणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार अप्पर आयुक्त आनंद जोगदंड यांनी केले. महावीर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात आयोजित ‘राष्ट्रीय सहकार धोरण व नवीन बहुउद्देशीय सहकारी पतपुरवठा संस्था : संधी व आव्हाने’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

   जोगदंड म्हणाले, “ऊर्जा, आरोग्य, पर्यटन, वाहतूक-दळणवळण या क्षेत्रांमध्ये सहकाराला मोठी संधी आहे. सहकार ही लोकचळवळ बनवण्यासाठी सहकारातील लोकांनीच आपल्या दृष्टिकोनात बदल करावा. शासनाने सहकार धोरणांची अंमलबजावणी तळागाळातील संस्थांपर्यंत पोहोचवली पाहिजे. यासाठी सहकार विभागाने सुस्पष्ट रोडमॅप तयार करून शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती प्रसारावर भर द्यावा.”

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. अभिजीत कापसे म्हणाले, “कोल्हापूरच्या विकासासाठी सहकारी पर्यटनासारख्या नव्या संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. बदलत्या काळानुसार सहकार क्षेत्राने नवीन मार्ग शोधणे काळाची गरज आहे.”

      कार्यशाळेत सहकार निबंधक कार्यालयातील अधिकारी डॉ. एम. ए. मुरुडकर व अरुण काकडे यांनी विद्यार्थी तसेच विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. संजय ओमासे, आभार प्रदर्शन डॉ. सुजाता पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. माधुरी रसाळ यांनी केले.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मानसिंग पाटील, प्रा. सयाजी हुंबे आणि अर्थशास्त्र अभ्यास मंडळ यांनी विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा