![]() |
| कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रो. (डॉ.) जी. डी. यादव तसेच विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज येथे संपन्न होणार आहे.
दीक्षांत समारंभाची सुरुवात ज्ञानदंड मिरवणुकीने होणार असून ही मिरवणूक छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रशासकीय कार्यालयापासून सुरू होऊन मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत जाणार आहे. ज्ञानदंड मिरवणुकीत विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यापरिषदेचे सदस्य, अभ्यासमंडळांचे अध्यक्ष, विद्यापीठाचे अधिकारी व मान्यवर सहभागी होणार आहेत.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापन झालेले समूह विद्यापीठ आहे. या विद्यापीठाअंतर्गत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय ही तीन घटक महाविद्यालये कार्यरत आहेत. विद्यापीठात सध्या ५० पदवी अभ्यासक्रम व ३४ पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जात असून, १९ विषयांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या विद्यापीठात एकूण ८७०० विद्यार्थी शिक्षण घेत असून ११२ विद्यार्थी पीएच.डी. अभ्यासक्रमांतर्गत संशोधन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच संशोधन व कौशल्य विकास कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे.
विद्यापीठाचा हा द्वितीय दीक्षांत समारंभ असून या दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाची पालक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. विकास देशमुख, संस्थेचे सहसचिव मा. प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक मा. डॉ हेमंत उमाप, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, वित्त व लेखाधिकारी डॉ धनाजी जाधव, अधिष्ठाता प्रो. डॉ. डी डी नामदास, प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रो. डॉ. आर आर साळुंखे, प्रो. डॉ. टी. डी. महानवर, विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे,प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे, प्राचार्य डॉ. अरूण आंधळे व विविध मंडळाचे सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रत्यक्ष समारंभात विद्यापीठाचे कुलाधिकारी मा. चंद्रकांत दळवी, मा. पद्मश्री प्रो. (डॉ.) जी. डी. यादव आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते विद्याशाखानिहाय सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या ११ स्नातक व अधिस्नातकांना तसेच विषयनिहाय सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या ६७ स्नातक व अधिस्नातकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यात एकूण १७७४ स्नातक व अधिस्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे. या द्वितीय दीक्षांत समारंभास विविध खात्यांचे अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य व रयत सेवक उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा