Breaking

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

*दीक्षांत समारंभात डिजिटल शिक्षणाचा ठसा : ४९,९०० पदव्या नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी मध्ये अपलोड*


 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या आज पार पडलेल्या ६२ व्या दीक्षांत समारंभात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या दीक्षांत समारंभात वितरित करण्यात आलेल्या तब्बल ४९ हजार ९०० पदव्या नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी (NAD) या केंद्रिय डिजिटल व्यासपीठावर अपलोड करण्यात आल्या असून त्या संबंधित स्नातक व पदवीधर विद्यार्थ्यांना तात्काळ ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

     मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते या पदव्यांचे अधिकृतपणे NAD प्रणालीवर अपलोडिंग करण्यात आले. यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची सुरक्षितता, पारदर्शकता आणि सहज उपलब्धता मिळणार आहे.

     नॅशनल अकॅडमी डिपॉझिटरी प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शासकीय व खासगी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली पदवी प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात थेट वापरता येणार आहेत. यामुळे प्रमाणपत्र हरवणे, बनावट प्रमाणपत्रांचा धोका तसेच प्रमाणपत्रांच्या पडताळणीस लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

   डिजिटल इंडिया आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाने उचललेले हे पाऊल विद्यार्थी हिताचे, काळानुरूप आणि दूरदृष्टीचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

       प्र. कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या कार्यशील व उत्तम नेतृत्वाच्या माध्यमातून हा उपक्रम विद्यार्थी केंद्रित निर्माण केला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शिवाजी विद्यापीठ आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये गणले जात आहे.

    या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असून, भविष्यात सर्व शैक्षणिक दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा