Breaking

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

*गैरवर्तन करणाऱ्यांना अटक; कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई : पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचा कडक इशारा*


 जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : शहरात कायदा व सुव्यवस्था कोणत्याही परिस्थितीत बिघडू दिली जाणार नाही, असा ठाम इशारा जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिला आहे.

   प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याबाहेर उदगाव मधील पाटील व वरेकर या दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली. सदर प्रकरण सामंजस्याने मिटवण्याच्या उद्देशाने माजी सरपंचांनी दोन्ही कुटुंबांना बाहेर नेले होते. मात्र, तेथे वाद वाढून मारामारी झाली. या घटनेची पूर्वकल्पना पोलीस प्रशासनाला नव्हती.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली. संबंधित दोन्ही कुटुंबांतील एकूण नऊ जणांना अटक करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली असून, या प्रकरणात पोलीस अधिकारी स्वतः फिर्यादी आहेत.

   याबाबत जय हिंद डिजिटल न्यूज ला प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले की, “जयसिंगपूर शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल.”

       पोलीस प्रशासनाच्या तात्काळ व ठोस कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा