![]() |
| मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर माने, जयसिंगपूर, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम, डॉ. सोमनाथ काळे व डॉ. संभाजी निकम |
शाहिद सय्यद : विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी : “शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि शेतकरी हा आर्थिक प्रवाहाचा केंद्रबिंदू आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले. श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम उपस्थित होत्या.
डॉ. माने म्हणाले की, समाजातील शेतकरी, मागास, दलित व वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी आर्थिक न्याय व संधीची समानता अत्यंत महत्त्वाची आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली आर्थिक दृष्टी सक्षम समाज व राष्ट्रनिर्मितीचा पाया ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.आंबेडकरांच्या शेतीविषयक विचारांची मांडणी करताना त्यांनी जमीनदारी व खोतवाडी पद्धतीचा विरोध, थेट जमीन मालकी हक्क, कर्जबाजारीपणातून मुक्तता, जमिनीचे वैज्ञानिक वाटप, सहकार व संयुक्त शेती, जमिनी विभाजनाला विरोध व परिणामकारक कृषी धोरणाची गरज या बाबींचे सविस्तर विश्लेषण केले. तसेच डॉ. आंबेडकरांच्या जलधोरण, पाणी व्यवस्थापन व देशाच्या सर्वांगीण विकासात जलसंपत्तीच्या सुयोग्य वापराचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.गरीबी निर्मूलन, करप्रणाली, शिक्षण व आर्थिक उन्नतीसंबंधी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक धोरणांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. त्रिशला कदम म्हणाल्या की, “आर्थिक न्याय व संधीची समानता हीच सक्षम राष्ट्रनिर्मितीचा मुख्य स्तंभ आहे.” त्यांनी अर्थशास्त्रज्ञ डॉ. केन्स व डॉ. आंबेडकर यांच्या चलनविषयक विचारांची तौलनिक मांडणी केली.
कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी अर्थ, जलव्यवस्था, शेती, औद्योगिक धोरण व चलनव्यवस्था यावर आकर्षक भित्तीपत्रके प्रदर्शित करून सादर केली.
प्रा. डॉ. सोमनाथ काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. संभाजी निकम यांनी करून दिला. आभार साक्षी हुपरे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पैलवान यांनी केले. सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ. जाधव, प्रा. डॉ. कुरणे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा