![]() |
| रेड रिबन क्लब आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलताना समुपदेशक संदीप तकडे, अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले व प्रा. डॉ. प्रभाकर माने |
प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक
जयसिंगपूर : “जागरूक समाजाशिवाय एड्समुक्त भारताची कल्पनाच अशक्य आहे,” असे प्रतिपादन करत एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टी ही आजची अत्यावश्यक गरज असल्याचे मत शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे एड्स समुपदेशक संदिप तकडे यांनी व्यक्त केले.जयसिंगपूर कॉलेजच्या रेड रिबन क्लबतर्फे जागतिक एड्स सप्ताहानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांसाठीच्या मार्गदर्शन व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्या शाखा प्रमुख प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले उपस्थित होत्या.
तकडे यांनी एचआयव्ही/एड्सचा इतिहास, संसर्गाची कारणे, फैलावाची मार्गे, उपचारपद्धती, तसेच प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल सहजसुंदर आणि सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले, “एड्स हा असाध्य नसून योग्य उपचारांनी नियंत्रित ठेवता येणारा आजार आहे. सुरक्षित वर्तणूक, वेळीच निदान आणि नियमित ART उपचार यामुळे रुग्ण स्वस्थ आयुष्य जगू शकतो.”
समाजातील गैरसमज, अफवा आणि भीती दूर करणे अत्यंत गरजेचे असून ‘जाणिवा वाढल्या तर प्रतिबंध शक्य होतो’, असा ठाम संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी प्रतिबंधात्मक उपायांचे प्रभावी मांडणी केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. चौगुले यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी, आरोग्य-जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करण्याची आवश्यकता मांडली.
यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन करत योग्य आरोग्यदृष्टी जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व अधीक्षक संजय चावरे यांचे सहकार्य लाभले.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रभाकर माने (नोडल अधिकारी, रेड रिबन क्लब) यांनी केले.क्लबच्या अध्यक्षा अग्रजा कांबळे यांनी आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा