Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

*लेफ्टनंट सई संदीप जाधव हिचा लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमध्ये भव्य सत्कार*


 लेफ्टनंट सई संदीप जाधव हिचा सन्मान करताना कर्नल विक्रम नलवडे, अध्यक्ष राजेंद्र मालू, मेजर संदीप जाधव, चंद्रकांत जाधव,मुख्याध्यापक सयाजीराव पाटील व मुख्याध्यापक सुनील कोळी व संगिता घेवारी मॅडम 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (IMA) ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रशिक्षण पूर्ण करून पहिली महिला अधिकारी म्हणून लेफ्टनंटपदी निवड झालेल्या लेफ्टनंट सई संदीप जाधव हिचा लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर येथे भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिर, कै. श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर व लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन मा. राजेंद्रजी मालू होते.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल विक्रम नलवडे (कमांडिंग ऑफिसर, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते लेफ्टनंट सई जाधव हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.यावेळी कर्नल विक्रम नलवडे यांनी विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची भावना मनात रुजवून कर्तव्यभावनेने देशसेवा करावी, असे आवाहन केले. 


    लेफ्टनंट सई जाधव हिची जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, हलगीच्या गजरात लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने तिचे स्वागत केले. फुलांच्या पायघड्यावरून आगमन होत असताना विद्यार्थिनींनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.

   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सयाजीराव पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख एनसीसी प्रमुख सतीश भोसले यांनी करून दिली. सन्मानपत्राचे वाचन जिमखाना प्रमुख सुनील हजारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मा. राजेंद्रजी मालू यांनी लेफ्टनंट सईच्या कार्याचा गौरव करून तिच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट सई जाधव हिने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने देशसेवेचे व्रत हाती घ्यावे, यासाठी मानसिक, शारीरिक व बौद्धिक तयारी आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच प्रशिक्षण काळातील स्वअनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

   या कार्यक्रमास लेफ्टनंट सईचे वडील मेजर संदीप जाधव, आई ज्योती जाधव, स्कूल कमिटी सदस्य मा. चंद्रकांत जाधव, राजेश जाधव, संगिता घेवारी मॅडम, स्कूल कमिटी व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. 

  तसेच लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, बळवंतराव झेले हायस्कूल, कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर कॉलेज, कस्तुरीबाई वालचंद कॉलेज (सांगली) येथील एनसीसी कॅडेट्स व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक सयाजीराव पाटील, रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कोळी व यशोदा मालू शिशुमंदिर विभागप्रमुख संगीता घेवारी तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांनी केले. सूत्रसंचालन  ए. के. भिलवडे व एस. बी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुनील कोळी यांनी केले.

  या कार्यक्रमास  बालवाडी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा