![]() |
| 🙏*तरुणांसाठी दिशादर्शक व आदर्शवादी निर्णय* |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
लातूर : आजच्या काळात लग्न म्हणजे बडेजाव, लाखो रुपयांचा खर्च, दिखावा आणि स्पर्धा अशी ओळख निर्माण होत असताना परभणीचे अभियंता शेखर माधव शेजुळ (B.Tech, MBA) यांनी मात्र या प्रवाहाला छेद देणारा, समाजाला दिशादर्शक ठरेल असा निर्णय घेतला आहे.
शेजुळ यांनी खरोळा (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील दत्त मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने, केवळ २५ नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. या विवाहात डीजे, वाजंत्री, हुंडा, आहेर, बॅनरबाजी किंवा कोणताही दिखावा करण्यात आलेला नाही.
लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळून, दोन्ही कुटुंबांनी समाजासाठी उपयोगी ठरेल असा स्तुत्य निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी प्रत्येकी ५ लाख रुपये, असे एकूण १० लाख रुपयांची देणगी शेखर यांच्या मुळगाव आबेगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला देण्याचा निर्णय घेतला आहे.या निधीतून शाळेत अद्यावत संगणक कक्ष (Computer Hall) उभारण्यात येणार असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.शेखर शेजुळ यांचा समाजाशी असलेला ऋणानुबंध याआधीही दिसून आला आहे. त्यांनी नोकरीचा पहिला पगार देखील याच शाळेला दिला होता.
तसेच त्यांचे वडील प्रा. डॉ. माधव देसाई शेजुळ यांनी २०१९ ते २०२५ या कालावधीत शाळेसाठी सुमारे १५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. या उपक्रमाला वधू ऋतुजा शिंदे (MBA) व शिंदे कुटुंबानेही पूर्ण पाठिंबा देत, सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला आहे.आज गरज आहे ती खर्चाच्या स्पर्धेपेक्षा शिक्षण, संस्कार आणि समाजहिताला प्राधान्य देण्याची आहे.
साधं लग्न आणि मोठा विचार या माध्यमातून शेखर–ऋतुजा शेजुळ दांपत्याने समाजासमोर एक प्रेरणादायी पाऊल ठेवले असून, हा निर्णय अनेक तरुणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा