Breaking

रविवार, ४ जानेवारी, २०२६

*अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे तमदलगेत विशेष श्रमसंस्कार शिबिर*


 अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले

*‘युवकांचा ध्यास, ग्रामीण भागाचा विकास’ या ब्रीदवाक्याने उपक्रम*


*प्रो. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने तमदलगे (ता. शिरोळ) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि ग्रामीण विकासाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित हे शिबिर शनिवार (ता. ३) ते शुक्रवार (ता. ९) या कालावधीत पार पडणार आहे. ‘युवकांचा ध्यास, ग्रामीण भागाचा विकास’ हे या शिबिराचे ब्रीदवाक्य असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी दिली.

       शिबिराचे उद्घाटन समारंभ तमदलगे येथील कुमार विद्यामंदिर येथे होणार असून उद्घाटक म्हणून सरपंच धनाजी नंदीवाले व उपसरपंच गौतम कांबळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मुसाई हे राहणार आहेत.  या शिबिरात महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवणार आहेत.

        शिबिराच्या कालावधीत स्वच्छता मोहीम, श्रमदान, वृक्षारोपण, जनजागृती उपक्रम, आरोग्य व सामाजिक विषयांवरील संवाद यासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी तज्ज्ञ वक्त्यांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

       रविवार (ता. ४) रोजी ऋषिकेश राऊत यांचे ‘पत्रकारितेतून सामाजिक प्रश्नांना न्याय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार (ता. ५) रोजी प्रा. रवींद्र पडवळे ‘राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार (ता. ६) रोजी जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. प्रभाकर माने यांचे ‘ग्रामीण विकासात एन.एस.एस.चे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार (ता. ७) रोजी प्रा. रमेश पाटील यांचे ‘क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन होईल. तर गुरुवार (ता. ८) रोजी कुरुंदवाड येथील एस. के. पाटील महाविद्यालयाचे डॉ. दीपक सूर्यवंशी ‘शहीद भगतसिंह आणि आजचा युवक’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान देणार आहेत. या शिबिरासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

      या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण आणि सेवाभाव विकसित होणार असून ग्रामीण भागाच्या विकासात युवकांचा सक्रीय सहभाग वाढीस लागणार आहे. या शिबिरातील व्याख्यानांचा व उपक्रमांचा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अमोल महाजन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा