![]() |
| पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समितींचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यासोबतच संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होईल.
निवडणूक प्रक्रियेनुसार १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारी, तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २६ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारांची अंतिम यादी २७ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार असून राज्यभरात २५,४८२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. प्रत्येक मतदाराला दोन मते देता येणार आहेत—एक जिल्हा परिषदेसाठी व एक पंचायत समितीसाठी. मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबवावा लागणार आहे.
या निवडणुकीत १२ जिल्हा परिषदांसाठी ७३७ सदस्य, तर १२५ पंचायत समित्यांसाठी १,४६२ सदस्य निवडले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा