Breaking

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

*जयसिंगपूरमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न ; आरोपीविरोधात गुन्हा दाखल*

 

 जयसिंगपुरात  अपहरण करण्याचा प्रयत्न फसला 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील शाहू नगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणीचा हात पकडून तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेदरम्यान तरुणीच्या वडील व भावाने प्रतिकार केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी कौस्तुभ किरण कोल्हापूर (वय ३२, रा. शाहू नगर, ९ नं. शाळेजवळ, जयसिंगपूर) असे संशयित आरोपीचे नाव असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        गुरुवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी घरासमोर फिरत असताना आरोपी मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने अचानक तिचा हात पकडून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा झाल्यानंतर तरुणीच्या वडील व भावाने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.फिर्यादीनुसार, सदर आरोपी गेल्या दोन वर्षांपासून पीडित तरुणीला सातत्याने त्रास देत असल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

       या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सई खोत करीत असून जयसिंगपूर पोलिसांनी आरोपीविरोधात भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत कलम ७४, ७५ (१)(एक), ७५ (१)(चार), ७६, ७८ (१)(२), ७९, १२६ (२), ३५१ (३) व ३५२ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

    पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा