![]() |
| आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर |
डॉ. महावीर रायाप्पा अक्कोळे, जयसिंगपूर
प्रसिद्ध धन्वंतरी व ज्येष्ठ लेखक (मो. ९९२२४४२४८०)
आद्य पत्रकार, मराठी पत्रकारितेचे शिल्पकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणूनही तो साजरा होतो. यानिमित्ताने या परमतेजस्वी ताऱ्याबद्दल... २०डिसे.१८१२
गेल्या वर्षी जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात देवगडला गेलो होतो. कोकणुचा समृद्ध निसर्ग नि हिरवाईने नटलेला परिसर मला नेहमीच भुरळ घालतो. वाडाकर गावी समुद्रकिनाऱ्याला सुधीर जोशींकडे छानपैकी दोन दिवस घालवून देवगडहून गगनबावडामार्गे परतताना एक सुखद अघटित घडले. दुतर्फा धुमारलेल्या करवंदीच्या जाळ्या, आंब्या-फणसाच्या झाडांनी वेढलेल्या वाड्यावस्त्यांमधून जाणाऱ्या डांबरी सडकेवरून माझी पत्नी कौशल्याने गाडी ड्राईव्ह करीत असताना मी मात्र खिडकीतून दिसणारा हिरवागार आसमंत न्याहाळत मुलींनाही काही दाखवत होतो. अचानक रस्त्याकडेला एक छोटासा फलक नजरेत आला नि मी गाडी थांबवायला सांगितली. फलकावरील अक्षरांनी जणू माझ्यावर गारुड केले. एका छोट्या रस्त्याच्या दिशेने बाण काढून त्यावर लिहिले होते 'आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक' नि त्यापुढे ५ की ६ कि.मी.चा अंतराचा आकडा होता. मी स्वतः मुंबईच्या एका अॅकॅडमीचा पत्रकारितेचा डिप्लोमा, शिवाजी विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवीचा अभ्यासक्रम मन लावून पूर्ण केला असल्याने बाळशास्त्री जांभेकर यांचे स्थान माझ्या मनात एखाद्या दैवताप्रमाणे स्थापित होते. त्यामुळे हा बोर्ड पाहून एखाद्या फाटक्या भिकाऱ्याला कोट्यवधीचा खजिना मिळाल्यासारखी माझी मनःस्थिती झाली होती. आम्ही लगेच गाडी वळवली नि बाणाच्या दिशेने दामटली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभुर्ले गावाची देवळवाडीतली ही जांभेकरांची वस्ती म्हणजे बाळशास्त्रींचे जन्मस्थान, हे नितांत रमणीय स्थळ महाराष्ट्रातल्या किती पत्रकारांना माहिती आहे? किती जणांनी या पत्रकारांच्या तीर्थक्षेत्राला भेट दिलीय ? उणेपुरे अवघे ३४ वर्षे लाभलेल्या आयुष्यात या अवलिया ज्ञानयात्रिकाने काय काय इतिहास रचला हे किती जणांना माहीत आहे? मला हा अचानक लाभलेला सुवर्णक्षण मी मनात कायमचा साठवून ठेवत होतो नि फलटणच्या (जि. सातारा) महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेत्र बाळशास्त्रींच्या स्मारकासाठी हीच जागा निवडल्याबद्दल मनोमन धन्यवादही देत होतो.सामान्यतः महाराष्ट्रातल्या सुशिक्षित जनतेला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची ओळख फक्त मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, 'दर्पणकार' म्हणून असली तरी त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात इतके भव्य विविधांगी कर्तृत्व सिद्ध केले की, त्यांच्या मृत्यूनंतर अनेक मान्यवरांनी त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे जनक' म्हणून सन्मानाने गौरविले.
६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी मराठीतले पहिले मराठी-इंग्रजी वृत्तपत्र 'दर्पण' चालू केले हे तर आपल्याला माहीतच आहे; पण मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' ची स्थापनाही त्यांनीच १ मे १८४० रोजी केली. सन १८३४ मध्ये ते मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर बनले. सन १८४५ मध्ये त्यांनी 'बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी' या मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी या मुंबईच्या 'लोकसुधारणा' व्यासपीठाचेही ते संस्थापक होते. १८४४ ते १८५५ या काळात बाळशास्त्री जांभेकर यांनी दक्षिण मुंबई इलाख्याचे पहिले मराठी शाळा तपासणीस आणि पहिले शिक्षणाधिकारी म्हणून सन्मानाने पद भूषविले. मुंबईतल्या सन १८४५ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे ते जसे संस्थापक होते, तसे कुलाब्याच्या वेधशाळेचे तत्कालीन संचालकही होते. ज्याच्या आधारे सध्याच्या डी.एड. नि बी.एड कॉलेजीसची संकल्पना उदयास आली, त्या मुंबई येथील पहिल्या अध्यापक वर्गाचे ते संचालक होते. बोर्ड ऑफ एज्युकेशनमध्ये गणित आणि ज्योतिषशास्त्राचे 'अॅक्टिंग प्रोफेसर' म्हणून बाळशास्त्रींनी उत्तम कामगिरी बजावली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी या श्रेष्ठ ग्रंथाचे प्रथमच मराठीत खिळाप्रेसवर प्रकाशन करून जांभेकर यांनी नवे युग चालू केले. सुरुवातीला ते सातारच्या छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह राजेभोसले यांच्या दरबारात रुजू झाले व नंतर राजाज्ञेने अक्कलकोटचे राजपुत्र शहाजीराजे भोसले यांचे प्रशिक्षक बनले. सन १८४० मध्ये बाळशास्त्रींच्या विविध क्षेत्रांतील कायनि प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांनी 'जस्टिस ऑफ दि पीस' या अत्यंत मानाच्या पदावर नियुक्त केले होते. अद्भुत अष्टपैलू प्रतिभा प्राप्त झालेल्या बाळशास्त्रींनी भाषा, इतिहास, भूगोल, गणित, मानसशास्त्र आदी विषयांवर अभ्यासपूर्ण असे १३ ग्रंथ लिहिले. समाजसुधारणेसाठी चळवळ उभी करताना बाळशास्त्रींना ना. जगन्नाथ शंकरशेठसारख्या नामवंतांनी प्रोत्साहन देऊन सर्वतोपरी सहकार्य केले होते.
एक लेखात असे वाचायला मिळाले की, लोकमान्यांचे नाव प्रथम 'केशव' ठेवलेले होते; पण मालवण येथे शिक्षक म्हणून गंगाधरपंत टिळक काम करत असताना बाळशास्त्री शाळा तपासणीस व शिक्षणाधिकारी होते. त्यांची कीती भारतभर पसरली होती. याचा प्रचंड अभिमान असलेल्या टिळकांनी 'केशव' नाव बदलून 'बाळ' असे केले. यामागे बाळशास्त्रींसारखाच आपला मुलगाही विद्वान, कर्तृत्ववान व लोकप्रिय व्हावा ही भावना होती व झालेही तसेच, असा हा प्रथम पत्रकार, आद्य शिक्षणतज्ज्ञ, इतिहास-पुरातत्त्व संशोधक, विद्वान गणिती, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, संस्कृत-मराठी-इंग्रजी पंडित, शिक्षक असलेला विलक्षण माणूस कोकणात फिरायला गेल्यावर १२ मे रोजी विषमज्वराने आजारी पडतो काय नि पाहता पाहता आजार बळावून, १७ मे १८४६ रोजी मुंबईत हे जग सोडून जातो काय। सारेच विलक्षण, बाळशास्त्री त्यांचे सारे आयुष्य जगले असते तर? महाराष्ट्राचे भाग्य तेव्हाच बदलून गेले असते। खरे तर बाळशास्त्री जांभेकर हा विषयच मुळी संशोधन करण्याचा आहे. त्यांचे एक विस्तृत चरित्र, एक चिरस्थायी अखंड स्कूती देणारे भव्य स्मारक या महाराष्ट्राला पाहायला कधी मिळेल?
तिथे राहत असलेल्या त्यांच्या चुलत पणतूने सुधाकर रामचंद्र जांभेकर यांनी सांगितले की, १७ मे या बाळशास्त्रींच्या पुण्यतिथीच्या दिवशी भारतभर विखुरलेले जवळपास ६०० जांभेकर आवर्जुन पोंभुर्त्याच्या देवळवाडीत एकत्र येतात. खूप मोठा कार्यक्रम होतो. बाळशास्त्रींना आदरांजली वाहिली जाते. ६ जानेवारीb या पत्रकारदिनी कोकणातले सर्व पत्रकार एकत्र येऊन स्मारकामध्ये पत्रकार दिन मोठ्या दिमाखात साजरा करतात, पत्रकारितेच्या या पंढरीची वारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या पत्रकाराने करावी नि बाळशास्त्रींच्या पुतळ्याच्या पायी माथा टेकवावा. पत्रकारिता सार्थकी लागल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटेल असे हे ठिकाण आहे.
*बाळशास्त्री जांभेकर यांना त्रिवार अभिवादन🙏*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा