Breaking

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

शिवाजी विद्यापीठात भारतीय अर्थमिती संस्थेची हीरक महोत्सवी राष्ट्रीय परिषद २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान

 




*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक* 


*तीन दिवसांच्या परिषदेसाठी अर्थशास्त्र अधिविभागाचा पुढाकार : प्रा. डॉ. एम. एस. देशमुख*

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्थेची हीरक महोत्सवी (६० वी) वार्षिक राष्ट्रीय परिषद दि. २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मानव्य विज्ञान विद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता व अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख तसेच परिषदेचे सचिव प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी दिली.

      परिषदेच्या उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. महेंद्र देव (चेअरमन, आर्थिक सल्लागार समिती, पंतप्रधान कार्यालय, भारत सरकार) उपस्थित राहून संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त अध्यक्ष डॉ. नीरज हातेकर अध्यक्षीय भाषण करणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदेपस्थित राहणार आहेत.

     उद्घाटन सोहळा विद्यापीठाच्या शाहू सिनेट हॉल (मुख्य प्रशासकीय इमारत) येथे सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत होणार असून, विविध संशोधकांनी सादर केलेल्या संशोधन लेखांच्या संक्षिप्त सारांशाचे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.

         तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशातील नामांकित अर्थतज्ज्ञांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. त्यामध्ये डॉ. एस. चंद्रशेखर, डॉ. विनिश कथुरिया, डॉ. प्रबळ रॉय चौधरी, डॉ. फरझाना आफ्रेदी, डॉ. ए. गणेश कुमार, डॉ. बिस्वजित चटर्जी, डॉ. तिर्थंकार पटनाईक आणि डॉ. बी. कामाईहा यांचा समावेश आहे.

    यासोबतच आयोजित गटचर्चांमध्ये डॉ. उमाकांता दास, डॉ. पूजा गुहा, डॉ. आर. नागराज, प्रा.डॉ.ज्ञानदेव तळूले, प्रा.डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. सुरेश मैंद आणि डॉ. विनायक देशपांडे सहभागी होणार आहेत.

      या परिषदेसाठी विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे सचिव प्रा. डॉ. एम. एस. देशमुख तसेच भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव प्रा. के. शानमुगन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा