Breaking

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलला CBSE ची मान्यता ;विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नवीन संधी

 

अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलला CBSE ची मान्यता

प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक 


जयसिंगपूर (ता. शिरोळ) : येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी महत्त्वाची घडामोड घडली आहे. येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेला देशातील प्रतिष्ठित सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) या राष्ट्रीय शिक्षण मंडळाची अधिकृत संलग्नता प्राप्त झाली आहे.

       या मान्यतेमुळे जयसिंगपूर परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाधारित अध्यापन, प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या उपक्रमांमुळे शाळेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

     शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी CBSE अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.

         ‌संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, प्रा. आप्पासाहेब भगाटे,बाळासाहेब इंगळे,संस्थेचे पदाधिकारी, स्कूल मॅनेजर अभिजीत अडदंडे व शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्राचार्य प्रिया गारोळे व शाळेचे सर्व शिक्षकवृंदाने अधिक  परिश्रम घेतले.

    या यशाबद्दल परिसरातील नागरिक, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे. शाळेच्या या प्रगतीमुळे परिसरातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा