![]() |
| फसवणूक |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
इचलकरंजी : शहापुर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ६ पोलिसांनी सोनारावर दबाव टाकुन घेतलेले १२५ ग्रॅम सोने वडगाव पोलीस ठाण्यात जमा न करता स्वतः वापरले. त्यामुळे कर्तव्यात कसुर करुन फसवणुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्या सोनाराने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शहापुर पोलिसांनी चोरीतील जयसिंगपुरमधील सोनाराकडून जप्त केलेले १२५ ग्रॅम सोने वडगाव पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात वर्ग केले नाहीत. त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्यात झालेला वाद आणि त्याची तक्रार थेट जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे झाल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता चौकशीत १२५ ग्रॅम सोने स्वतः वापरल्याचा दाट संशय असल्याने पोलिसांच्या एकूणच कामावर संशय व्यक्त होत आहे. ढपला पाडण्याच्या या प्रकारामुळे शहापुर पोलिसांचे कारनामे चव्हाट्यावर येत असून अशाप्रकारे रक्षक असलेले पोलीस भक्षक बनले तर नागरीकांनी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहापुर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत करण्यासाठी जयसिंगपुरमधील गल्ली नं. १६ मधील एका सोनाराकडे पोहचले. त्या सोनाराने मी चोरीचे सोने घेतले नाही तर एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाक डुन ३० ग्रॅम सोने खरेदी केल्याचे सांगितले. तरीही पोलीस त्या सोनाराकडुन २२० ग्रॅम सोन्याची मागणी करत होते. सोनाराने नकार दिल्याने त्याला ११ गुन्ह्यात अडकवु, तुझे दुकान कायमचे बंद करु, मोका अंतर्गत कारवाई करण्याची धमकी देत होते. त्यामुळे भयभित झालेल्या सोनाराने ९ डिसेंबर २०२५ रोजी शहापुर पोलीस ठाण्यात जाऊन २४ कॅरेट सोन्याची १२५ ग्रॅमची लगड दिली. त्यावेळी हस्तगत केलेले सोने वडगाव पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील असल्याने त्यांना देणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले होते. तरीही २ फेब्रुवारी रोजी वडगावचे पोलीस गुन्ह्यातील १२५ ग्रॅम सोने देण्यासाठी तगादा लावत होते.
दरम्यान, घरफोडीतील सोने जप्त करण्यावरुन शहापुर आणि वडगाव पोलिसांमध्ये वाद झाला. हे वादाचे प्रकरण जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत पोहोचले. त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी सुरु असतानाच या प्रकरणात शहापुर पोलीस ठाण्याकडील आयुब गडकरी याला निलंबीत करण्यात आले आहे. मात्र गंभीर बाब म्हणजे शहापुर पोलिसांनी वडगावच्या गुन्ह्यातील सोने सोनाराकडुन हस्तगत केले असले तरी ते वडगाव पोलिसांकडे जमा केले नाही. त्यामुळे वडगावचे पोलीस त्या सोनाराकडे गुन्ह्यातील १२५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यासाठी पोहचले. त्यांनीही गुन्ह्यातील १२५ ग्रॅम सोने देण्यासाठी तगादा लावला आहे.
पोलिसांच्या या त्रासाला कंटाळलेल्या त्या सोनाराने ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस प्रमुख, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख आणि जयसिंगपुरच्या पोलीस उपअधिक्षकांकडे धाव घेऊन शहापुर पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ६ पोलिसांनी दबाव टाकुन घेतलेले १२५ ग्रॅम सोने वडगाव पोलीस ठाण्यात जमा न करता स्वतः वापरले आहे. त्यांनी कर्तव्यात कसुर करुन माझी फसवणुक केली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी आणि माझ्याकडुन शहापुर पोलिसांनी घेतलेले १२५ ग्रॅम सोने वडगाव पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश द्यावेत, तोपर्यंत माझ्यावर वडगाव पोलिसांनी कारवाई न करण्याबाबत निर्देष देण्याची मागणी केली आहे.
या गंभीर प्रकारामुळे शहापुर पोलिसांच्या कारणाम्याचे पितळ उघडे पडले असून सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रिद वाक्य घेऊन कार्यरत असलेले पोलीस म्हणजेच रक्षक अशाप्रकारे भक्षक बनत असतील तर नागरीकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा