![]() |
| मरणोत्तर नेत्रदान |
प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
कोल्हापूर : “संपलो जरी मी, तरी कुणाच्या नजरेत अजून जगतो मी” या उदात्त भावनेची प्रत्यक्ष अनुभूती देणारी घटना अरळगुंडी (ता. गडहिंग्लज) येथे घडली. येथील ज्येष्ठ नागरिक निरंजन बापुसाहेब पाटील (वय ७०) यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे निधन झाले होते.
अरळगुंडी गावातील हे पहिलेच नेत्रदान ठरले असून गावात सामाजिक जाणीव आणि मानवतेचा संदेश देणारी ही घटना मानली जात आहे. मृत्यूनंतर काही तासांपर्यंत डोळ्यांचे कार्यक्षम अस्तित्व टिकून राहते आणि त्या नेत्रांमुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींना पुन्हा जग पाहण्याची संधी मिळू शकते, ही जाणीव या उपक्रमातून अधोरेखित झाली.मयत निरंजन पाटील हे जयसिंगपूर येथील सुप्रसिद्ध शैक्षणिक मार्गदर्शक, व्याख्याते व अभिनव शिक्षण संकुल चे कार्यकारी संचालक प्रा. संदीप निरंजन पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.
गावातून स्वयंस्फूर्तीने होत असलेल्या अशा नेत्रदानामुळे समाजात जागरूकता वाढत असून “मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगता येते” हा मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा