Breaking

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

*कुरुंदवाड येथे ७८ वा ‘सर्वोदय दिन’ मेळावा उत्साहात; गांधी विचारांचा जागर*

 

 विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमेय तिरोडकर व आशुतोष शिर्के

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कुरुंदवाड : येथील महात्मा गांधी विचार प्रचारक समितीच्या वतीने ‘सर्वोदय दिना’ निमित्त कृष्णा–पंचगंगा नदी संगम घाटावर स्वातंत्र्य सैनिक, सर्वोदयी कार्यकर्ते व गांधीवादी विचारवंतांचा ७८ वा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

   १२ फेब्रुवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या पवित्र अस्थींचे विसर्जन कुरुंदवाडच्या संगम घाटावर करण्यात आले होते.  त्या स्मृति दिनानिमित्त गेली ७७ वर्षे परिसरातील विविध जिल्ह्यांतील गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते ‘सर्वोदय दिन’ म्हणून हा दिवस साजरा करीत आहेत.

         प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून फ्रंट लाईन मॅगझिनचे विशेष प्रतिनिधी अमेय तिरोडकर तसेच युवक बिरादरीचे मुंबई उपाध्यक्ष आशुतोष शिर्के यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी गांधी विचारांच्या अनुषंगाने संवाद साधला. गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकत विचारांचा जागर घडवून आणला.

    अध्यक्षस्थानावरून बोलताना अल्लाउद्दीन दानवाडे यांनी “आज आणि भविष्यातील जगाला महात्मा गांधींच्या तत्वज्ञानातूनच शांतीचा मार्ग सापडेल,” असा विश्वास व्यक्त केला.

      या मेळाव्यात महात्मा गांधींची विश्वस्त संकल्पना, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामस्वावलंबन, सामाजिक सद्भावना, निर्मल ग्राम व तंटामुक्त ग्राम योजना, ‘नवे गाव’ आंदोलन, खादी मीमांसा आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जुगळे यांनी केले.आभार राजकुमार दिवटे यांनी मानले.

   यावेळी स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, दत्त ज्युनिअर कॉलेज कुरुंदवाड, जनता हायस्कूल शिरोळ व शांताबाई शेंडुरे महाविद्यालय हुपरी येथील विद्यार्थी तसेच राष्ट्रसेवा दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी विचार प्रचारक समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा