![]() |
| कागवाड येथे महिलेचे जट निर्मूलन व उपस्थित अनिसचे कार्यकर्ते |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
बेळगाव : कर्नाटकातील कागवाड येथे १५ वर्षांपासून वाढलेली सुमारे सहा फूट लांबीची व सहा किलो वजनाची जट यशस्वीरित्या काढून सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा उपक्रम पार पडला. देवदासी परंपरेशी संबंधित कमल वाघमोरे यांची जट वैद्यकीय दक्षता आणि समुपदेशनानंतर काढण्यात आली.
जट काढण्यापूर्वी महिलेचे समुपदेशन करून कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यात आला. जट काढल्यानंतर संबंधित महिलेनं हलकेपणा व समाधान व्यक्त केले.जटा निर्मूलन हा महिलांच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मानाशी निगडित विषय असून अशा उपक्रमांमुळे अंधश्रद्धेविरुद्ध सकारात्मक वातावरण निर्माण होते. कागवाड येथील या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जागृतीचा संदेश पोहोचला आहे.
राष्ट्र सेवा दलचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) शिरोळ तालुका मार्गदर्शक बाबासाहेब नदाफ यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे तसेच प्रा. अशोक आलगोंडी व प्रा. संजय माने यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गडहिंग्लज येथील कार्यकर्ते अरविंद बारदेस्कर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा