![]() |
| अर्थसंकल्पीय चर्चासत्रात मार्गदर्शन करताना सुयेक चे नूतन अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
इचलकरंजी : येथील जयवंत महाविद्यालय येथे शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) व जयवंत महाविद्यालय यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत अर्थशास्त्र व वाणिज्य विभागामार्फत ‘केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
सुयेकचे नूतन अध्यक्ष प्रा. संजय ठिगळे मार्गदर्शन करताना म्हणाले, यावेळी अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, वाहतूक पायाभूत सुविधा आणि आरोग्य सक्षमीकरण यांसारख्या मानवी जीवनाच्या मूलभूत घटकांवर विशेष भर देण्यात आल्यामुळे हा अर्थसंकल्प देशाला सक्षम व आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. तसेच भविष्यात विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकेत डॉ. शकुंतला पाटील यांनी चर्चासत्र आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. दिलावर जमादार म्हणाले, सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ संकल्प न राहता प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थिनी सानिया पाटील, सानिया मुल्ला, आकांक्षा सुतार, योगेश्वरी कांबळे आणि अनुष्का सिंग यांनी अर्थसंकल्पावर तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर सांगोपांग व सविस्तर चर्चा झाली. सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी विशेष कौतुक केले.
सूत्रसंचालन प्रतीक्षा मलिकवाडे यांनी केले, तर आभार कोमल कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. मनोहर कोरे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा