Breaking

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

*देशप्रेमाची अनोखी अभिव्यक्ती : जयसिंगपूर कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त सैनिकांचा सन्मान*

 

CRPF जवान मनोज लोखंडे मार्गदर्शन करताना व अन्य मान्यवर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त देशासाठी प्राणपणाने सेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करून देशप्रेमाची अनोखी अभिव्यक्ती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सीआरपीएफचे जवान मनोज लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचा यथोचित सत्कार प्रा. डॉ. विजयमाला चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. टी. एम. चौगुले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

     यावेळी मनोगत व्यक्त करताना जवान मनोज लोखंडे म्हणाले की, व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असला तरी भारतीय संविधान, देशाचा तिरंगा आणि देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सैनिकांविषयी प्रेम व्यक्त करणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे. महाविद्यालयाने अशा प्रकारचा उपक्रम राबवणे ही युवकांमध्ये देशाभिमान जागवणारी प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि करिअरच्या विविध संधींबाबत उदाहरणांसह मार्गदर्शनही केले.


    अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. चौगुले यांनी व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमी युगुलांनी साजरा करण्याचा दिवस नसून देश, समाज आणि मानवतेविषयी व्यापक प्रेम व्यक्त करण्याची संधी असल्याचे सांगितले. देशाच्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्वसमावेशक प्रेमाचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. भारत आलदर यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. सुरज चौगुले यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.

       या कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. तुषार घाटगे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. आर. नकाते, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, प्रा. गणेश कुरले, प्रा. सत्यजित माने, प्राध्यापकवृंद, एनएसएस प्रतिनिधी अग्रजा कांबळे, रोहन लाले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 टिप्पणी:

  1. व्हॅलेंटाईन डे दिवशी राबविलेला हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच देशप्रेमाची भावना वृध्दींगत करेल.

    उत्तर द्याहटवा