Breaking

शनिवार, ७ मार्च, २०२६

*कुरुंदवाडच्या ऋषिकेश आलासेचे यूपीएससीत दमदार यश : देशात ६१ वा क्रमांक*

 

ऋषिकेश विद्या राजेंद्र आलासे, UPSC रँक -61


*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*


कुरुंदवाड : हल्लीच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे मोठे आव्हान मानले जाते. या कठीण परीक्षेत कुरुंदवाड येथील ऋषिकेश राजेंद्र आलासे (वय २७) याने देशात ६१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे तो आता भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी म्हणून कार्यरत होणार आहे.

        ऋषिकेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण आप्पासाहेब बिरनाळे विद्यालय, सांगली येथे झाले, तर पुढील शिक्षण मुंबई येथे पूर्ण झाले. शालेय जीवनातही तो अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेत (NTSE) त्याने देशात १७ वा क्रमांक मिळवला होता.

      लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्याने मुख्यत्वे स्वयं अध्ययनाच्या जोरावर केली. दोन वेळा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही; मात्र हार न मानता जिद्दीने आणि सातत्याने अभ्यास करत राहिल्यामुळे अखेर त्याने हे यश मिळवले.

     ऋषिकेशचे वडील डॉ.राजेंद्र आलासे व आई डॉ. विद्या आलासे हे दोघेही जयसिंगपुरात वैद्यकीय सेवेत  कार्यरत आहेत. मुलाच्या यशामुळे कुटुंबासह कुरुंदवाड परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

   यशाबद्दल बोलताना ऋषिकेश म्हणाला, “ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने अभ्यास करणे आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींनी चौफेर वाचन ठेवून ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास कोणतेही क्षेत्र अवघड नाही.”

      कुरुंदवाडच्या या सुपुत्राने मिळवलेल्या यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा