Breaking

शुक्रवार, २७ मार्च, २०२६

*टाकळीवाडीच्या कन्येचा सांगलीत गौरव : पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते कविता निर्मळे सन्मानित*


 पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते विशेष कामगिरीबद्दल कविता पुंडलिक यांना पुरस्कार प्रदान करताना 


*रफिया रांगोळे : विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर   : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील कन्या कविता पुंडलिक निर्मळे यांनी कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रमाच्या जोरावर पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

        कविता निर्मळे सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. पोलीस तपासातील तांत्रिक बाबी हाताळणे, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे तसेच गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे आणि कागदपत्रांची वेळेत पूर्तता करणे या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडल्या आहेत. त्यांच्या याच चोख कामगिरीची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात येत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

        सांगली पोलीस दलाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कविता निर्मळे यांच्या कार्याचे कौतुक करत खाकी वर्दीतील शिस्त, समर्पण आणि कामाप्रतीची जिद्द यामुळेच यशाची शिखरे गाठता येतात, असे सांगितले.

      कविता निर्मळे यांच्या या यशामुळे त्यांच्या मूळ गावी आनंदाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील मुलीने पोलीस दलात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत मिळवलेला हा सन्मान प्रेरणादायी ठरत आहे. महिला वर्ग व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, प्रामाणिकपणे काम केल्यास त्याची दखल नक्की घेतली जाते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा