Breaking

रविवार, ७ जून, २०२६

मिरजमध्ये ‘ईद-ए-गदीर’ उत्साहात साजरी; फिदा ए मोहम्मद ग्रुपतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 

ईद-ए-गदिर या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले मुस्लिम बांधव 

*प्रा. मेहबूब मुजावर  : विशेष प्रतिनिधी*


मिरज  : मुस्लिम धर्मीयांमध्ये अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली ‘ईद-ए-गदीर’ मिरज शहरात धार्मिक उत्साह आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या पवित्र दिनाचे औचित्य साधून ‘फिदा ए मोहम्मद ग्रुप’ आणि स्थानिक मित्र परिवाराच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        इस्लामिक दिनदर्शिकेनुसार १८ जिलहिज्ज रोजी साजरा होणाऱ्या ‘ईद-ए-गदीर’ला मुस्लिम समाजात विशेष महत्त्व आहे. इस्लामिक परंपरेनुसार, पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांनी आपल्या अंतिम हज यात्रेनंतर गदीर खुम येथे मुस्लिम बांधवांना संबोधित करत हजरत अली इब्ने अबी तालीब यांना समाजाचे नेतृत्व सोपविल्याची ऐतिहासिक घटना या दिवसाशी संबंधित मानली जाते. त्यामुळे हा दिवस इमामत अर्थात धार्मिक नेतृत्वाच्या स्मरणाचा आणि श्रद्धेचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

      या निमित्ताने मिरजमध्ये विशेष प्रार्थना सभा, सामूहिक भोजन (नियाज), गरजूंना मदत व दानधर्म यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच समाजात बंधुभाव, एकात्मता आणि धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.

      कार्यक्रमास शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि परस्पर सद्भावनेला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिदा ए मोहम्मद ग्रुपच्या वतीने इजाज मुल्ला (बापू), इम्रान मेस्त्री, साहिल शरिकमसलत, निहाल आगा, इकबाल दर्यावर्धी, सलमान हेर्लेकर आणि शकील बुजरुक यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा