![]() |
| कालवश माजी प्राचार्य सुधाकर मानकर, कोल्हापूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : येथील प्राध्यापक चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, सुटा संघटनेचे मार्गदर्शक, जागतिक प्राध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे माजी अध्यक्ष व माजी प्राचार्य प्रा. सुधाकर मानकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून रक्षाविसर्जन मंगळवार, १२ मे रोजी सकाळी ९.०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, भाऊ, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रातील ५० वर्षांची अखंड सेवेच्या माध्यमातून प्रा. मानकर सरांनी गेली तब्बल पाच दशके उच्च शिक्षण क्षेत्रात सल्लागार, मार्गदर्शक व संघटनात्मक नेतृत्व म्हणून कार्य केले. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राध्यापकांच्या हक्कांसाठी व गुणवत्तावृद्धीसाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. प्राध्यापकांच्या हितासाठी त्यांनी व्यक्तिहितापेक्षा संघटनेला नेहमी केंद्रस्थानी ठेवले आणि अनेक आंदोलनांना यशस्वी नेतृत्व दिले.अध्यापन, लेखन आणि संशोधनातील भक्कम वाटचाल करीत श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या कॉमर्स विभागात त्यांनी तब्बल ३४ वर्षे अध्यापन व लेखन कार्य केले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाणिज्य आणि इतर विषयांवर १६५ पुस्तके लिहिली. शासनाच्या विविध अध्यादेशांचे संकलन व संपादन करून २४ महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे महाराष्ट्रातील प्राध्यापक, विद्यापीठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला मोठा आधार मिळाला.
ते महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट लेखक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पुस्तकांनी असंख्य विद्यार्थी, शिक्षक व संशोधक घडले.प्राध्यापक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व म्हणून उच्च शिक्षणातील अनेक प्रश्नांवर त्यांनी कायदेशीर लढे, आंदोलने आणि संघटनात्मक प्रयत्न केले. स्वार्थी राजकारणापासून दूर राहून तत्त्वनिष्ठ नेतृत्व देणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कार्यक्षम पदाधिकारी घडले आणि संघटना मजबूत झाली.
शिवाजी विद्यापीठावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नैतिक दबदबा होता. विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक गुणवत्तेसाठी ते सदैव अग्रभागी राहिले.प्रा.मानकर सरांनी भारतीय संविधान आणि पुरोगामी विचारांशी आपली वैचारिक नाळ जोडली होती. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्राध्यापकांवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी ते सातत्याने कार्यरत होते. प्राध्यापकांची गुणवत्ता वाढावी म्हणून त्यांनी विविध कार्यशाळांच्या माध्यमातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कोरोना काळातील धाडसी योगदानासह केलेल्या कामाची आजची आठवण येते.कोरोना महामारीच्या कठीण काळातही त्यांनी संघटना सक्षम ठेवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्य केले. जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रश्नासाठी त्यांनी संघर्षमय प्रयत्न केले. विविध शैक्षणिक समस्यांवरील लढ्यात ते सदैव अग्रभागी राहिले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य जागतिक प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षे कार्य केले. अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानव संसाधन मंत्रालयालाही मार्गदर्शन केले. मंत्रालयातील सचिवांपासून कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला.अखंड सकारात्मक ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व प्रा. मानकर सर हे सकारात्मक ऊर्जा, दूरदृष्टी आणि संघर्षशील विचारांचे प्रतीक होते. संघटनेच्या पडत्या काळातही त्यांनी प्राध्यापकांचे मनोबल उंचावले आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघटनात्मक कार्य सुरू ठेवले.
प्रा. सुधाकर मानकर सरांचे आकस्मिक निधन ही प्राध्यापक संघटनेसाठी व उच्च शिक्षण क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या संघर्षमय विचारांना, कार्याला आणि प्रेरणादायी आयुष्याला ही भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांची कार्यशैली, तत्त्वनिष्ठ नेतृत्व आणि ज्ञानसेवा पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा