| नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वाटप |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
*हलगीचा गजर, फुलांचा वर्षाव आणि सेल्फी पॉईंटमुळे पहिला दिवस ठरला संस्मरणीय*
जयसिंगपूर : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर येथे नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत व पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. आनंद, उत्सुकता आणि नवचैतन्याने शाळेचा परिसर फुलून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात नवीन विद्यार्थ्यांच्या भव्य स्वागत रॅलीने झाली. हलगीच्या दणदणाटात आणि फुलांच्या वर्षावात विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन करण्यात आले. एनसीसी व आरएसपी कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह यावेळी विशेष लक्षवेधी ठरला.
या कार्यक्रमासाठी स्कुल कमिटी सदस्य चंद्रकांत(बापू)जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक सयाजीराव पाटील व चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यासाठी नगरपालिका शिक्षण अधिकारी मेघन देसाई याचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात देणारा हा उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांसाठी विशेष फोटोशूटचे आयोजनही करण्यात आले होते.
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शिरा, पुलाव व म्हैसूरपाकचा स्वादिष्ट आहार देण्यात आला. तसेच विद्यार्थी व पालकांसाठी शाळेच्या परिसरात आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सतीश चिपरीकर यांनी केले, तर हजारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा