Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२६

नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमेला भक्तांचा महासागर

 

 श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे दर्शनासाठी भक्तांचा सागर


*प्रा. चिदानंद अळोळी  : उपसंपादक* 

    वाढत्या कृष्णा नदीच्या पाण्यातून घेतले श्रीदत्तांचे दर्शन; हजारो भाविकांची उपस्थिती

नृसिंहवाडी : श्री गुरुदत्तांचे पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत गुरुपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’च्या अखंड जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे मंदिरासमोर पाणी आल्याने हजारो भाविकांनी पाण्यातूनच श्रीदत्तांचे दर्शन घेत गुरुपूजन केले.

       गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे साडेचार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रींच्या पादुकांची महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती आणि शेजारती असे विविध धार्मिक विधी संपन्न झाले. कृष्णा-पंचगंगा संगमावर पवित्र स्नान करून भाविकांनी श्रीदत्तांचे दर्शन घेतले.

        कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरले असून मंदिरासमोरील परिसरही जलमय झाला होता. त्यामुळे श्री दत्त देवस्थान, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाने विशेष खबरदारी घेत सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या. वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान दिवसभर तैनात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

       दर्शनासाठी उत्तर घाटापासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी चार स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली. मुख्य वाहनतळ भरल्याने माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट आणि कॉलेज परिसरात पर्यायी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच कुरुंदवाड, कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर आणि गगनबावडा येथून जादा एसटी बसफेऱ्या सोडण्यात आल्या.

           उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी श्री दत्त देवस्थान, ग्रामपंचायत, शिरोळ पोलीस ठाणे आणि विविध शासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे वाहतूक नियोजन, एकेरी वाहतूक व्यवस्था आणि कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. सर्व यंत्रणांच्या समन्वयामुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा