Breaking

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

*'संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची'; रोजगारक्षम व सक्षम भारतासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक : प्रा. डॉ. प्रभाकर माने*

 

 मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते  प्रा. डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. सुनील चव्हाण व प्रा.डॉ. ए.डी.जाधव व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक* 


कुरुंदवाड  : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे 'भारतीय लोकसंख्या व रोजगार' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून जयसिंगपूर कॉलेजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील चव्हाण होते.

        प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी गेल्या शंभर वर्षांतील लोकसंख्याविषयक राजकीय चर्चांचा आढावा घेताना, केवळ लोकसंख्या वाढीची नकारात्मक बाजू मांडण्यापेक्षा उपलब्ध मानवी संसाधनांचा राष्ट्रविकासासाठी प्रभावी उपयोग करण्याची गरज व्यक्त केली. भारताच्या लोकसंख्येचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूप स्पष्ट करताना त्यांनी लोकसंख्या लाभांश (Demographic Dividend) ही देशासाठी मोठी संधी असल्याचे सांगितले.

  ते पुढे म्हणाले की, लोकसंख्येच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देणे ही काळाची गरज आहे. यासाठी त्यांनी मानव विकास निर्देशांक, जागतिक युवा विकास निर्देशांक आणि जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक यांसारख्या जागतिक निर्देशांकांमध्ये भारताची स्थिती सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

     शेतीपूरक उद्योग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), उद्योजकता, कौशल्य विकास, डिजिटल अर्थव्यवस्था, पर्यटन क्षेत्र आणि प्रति व्यक्ती गुंतवणूक वाढविण्यावर भर दिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांचे शिक्षण, सक्षमीकरण, प्रभावी कुटुंब नियोजन, उद्योगांचे विस्तारीकरण आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

      सरकारने प्रति व्यक्ती गुंतवणूक वाढवून लोकसंख्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास रोजगारक्षम व सक्षम भारताची उभारणी शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले,  देशात लोकसंख्या नियंत्रणाबाबत सातत्याने जनजागृती होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये व विविध सामाजिक संस्थांनी लोकप्रबोधनाची जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

      कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आबासाहेब जाधव यांनी केले. यावेळी डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. प्रमोद कांबळे, प्रा. देविदास चव्हाण, प्रा.सविता खरपी, प्रा. गणेश कुरले, शाहिद सय्यद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ऐश्वर्या रजपूत व आभारप्रदर्शन अथर्व पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा