Breaking

बुधवार, ८ जुलै, २०२६

*जयसिंगपुरात मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न*

 

मार्गदर्शन करताना मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पवार, माजी खासदार राजू शेट्टी, लोकमतचे संपादक वसंत भोसले व डॉ. महावीर अक्कोळे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरमध्ये  'मराठी भाषा आणि महाराष्ट्रधर्म' या विषयावरील कार्यकर्ता बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. दीपक पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विशेष करून या कार्यक्रमास माजी खासदार राजू शेट्टी श्रोता म्हणून उपस्थित होते.

       मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पवार म्हणाले की, मराठी भाषा महाराष्ट्रातच उपेक्षित होत चालली असून महाराष्ट्रधर्माची जाणीवही क्षीण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेची अधोगती हा प्रत्येक मराठी माणसाच्या चिंतेचा विषय असून, समाजाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन भाषेच्या संवर्धनासाठी सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक मराठी मनामध्ये महाराष्ट्रधर्माची भावना जागृत करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत संवाद साधला.

           प्रास्ताविकात कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. महावीर अक्कोळे यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार तथा लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या समस्या व वेदना अधोरेखित करत मराठी भाषा आणि महाराष्ट्रधर्माच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली.  

      प्रा. बाळगोंडा पाटील यांनी आभार व्यक्त केले.या कार्यकर्ता शिबिरास जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड तसेच परिसरातील विविध गावांतील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा