![]() |
| कथित अत्याचार प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यास निवेदन देताना सर्वपक्षीय पदाधिकारी |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शहरातील एका शाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरील कथित अत्याचाराच्या प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जयसिंगपूर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थिनीवरील कथित अत्याचाराची चर्चा शहरात सुरू असून, या गंभीर प्रकारामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या शिक्षकावरच असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपांची सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संशयित शिक्षकाचा शोध घेऊन गुन्हा दाखल करा. या प्रकरणातील संशयित शिक्षकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. तपासात कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप होऊ नये, याची दक्षता घेऊन पोलिसांनी जलदगतीने आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनी व तिच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण, समुपदेशन व कायदेशीर मदत उपलब्ध करून देत त्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच जयसिंगपूर शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावे
घडलेल्या कथित प्रकारामुळे विद्यार्थिनी व तिचे कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी संबंधित शाळा व प्रकरणातील संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायद्यानुसार स्वतः फिर्यादी होऊन कारवाई सुरू करावी आणि पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली.
अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, अशा प्रकरणात कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय पाठराखण खपवून घेतली जाणार नाही. शाळा प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाभिमानीचे शहराध्यक्ष शंकर नाळे, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव-घुणकीकर,मनसेचे भगवंत जाभळे, कुमार पुदाले, काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आम्रपाली कारंडे, प्रियांका जाधव, आदित्य चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष राज पवार, पवन सुतार, सतीश कोळेकर, अॅड. निलेश गांधी व सामाजिक कार्यकर्ते सरदार कारंडे, संजय घाटगे व महेश पोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा