Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

*माणूस' हाच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू : प्रा. डॉ.एन.पी.सावंत*

 

 मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एन. पी. सावंत, अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे व प्रा. डॉ. टी. जी. घाटगे 


 *लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*


*प्रा. डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर व साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. एन. पी. सावंत, तर अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे उपस्थित होते.

         मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील श्रमिक, वंचित व कष्टकरी घटकांचे जीवन प्रभावीपणे मांडले. परंपरागत चौकटींना छेद देत त्यांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. भाकरीसाठीचा संघर्ष, सामाजिक विषमता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या साहित्यामधून प्रकर्षाने दिसून येतो. रशियाचा त्यांचा प्रवास हा केवळ परदेशदौरा नव्हता, तर ‘खऱ्या माणसाच्या’ शोधाचा प्रवास होता. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचे जीवनमूल्ये हाच राहिला.

          यावेळी डॉ. सावंत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याचाही संक्षिप्त आढावा घेत त्यांच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव केला. स्वराज्याची प्रेरणा जनमानसात रुजविणारे टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणास्थान होते, असे त्यांनी सांगितले.

     प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. प्रा. डॉ. टी. जी. घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. सुरज चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक  प्रा. सुनील चौगुले, प्राध्यापकगण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे आयोजन भूगोल शास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा