Breaking

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

संशोधकांचा ‘जंगलमित्र’ भरत व्होवळे. बायोलॉजी विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय संशोधनासाठी रात्रंदिवस मदतीला धावणारा गगनबावड्याचा जैवविविधता अभ्यासक

 पीएच.डी.च्या प्रबंधावर भरत यांचे नाव कदाचित नसते; पण त्या संशोधनाच्या अनेक पानांमागे त्यांचे पाऊलखुणा नक्कीच असतात.

गगनबावडा : पीएच.डी. म्हणजे केवळ ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि पुस्तकांमधील अभ्यास नव्हे. पर्यावरण व वनस्पती - जीवशास्त्र संशोधकांसाठी खरे संशोधन सुरू होते ते जंगलाच्या वाटांवर, डोंगर-दऱ्यांमध्ये, नदीच्या उगमाजवळ आणि निसर्गाच्या कुशीत. अशा क्षेत्रीय संशोधनात संशोधकांना आपल्या परिसराच्या जैवविविधतेची अचूक माहिती असलेला स्थानिक मार्गदर्शक मिळणे ही मोठी जमेची बाजू असते. गगनबावडा तालुक्यातील तळये गावचे भरत मारुती व्होवळे हे अशाच अनेक संशोधकांसाठी विश्वासू ‘जंगलमित्र’ ठरले आहेत.

भरत मारुती व्होवळे 


विशेषतः प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) आणि जैवविविधता या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रजाती शोधण्यासाठी, त्यांचे अधिवास समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष जंगल परिसरात अभ्यास करण्यासाठी भरत यांची मोठी मदत होते. विशेष म्हणजे, या सर्व मदतीसाठी ते कोणतेही मानधन घेत नाहीत. केवळ मैत्री आणि संशोधनाला हातभार लागावा या भावनेतून ते हे काम करतात.

रात्री-अपरात्रीही संशोधकांसोबत जंगलात

पीएच.डी.च्या संशोधनासाठी अनेकदा विशिष्ट प्राणी, सर्प, कीटक किंवा वनस्पतींचा शोध घ्यावा लागतो. काही प्रजाती दिवसाऐवजी रात्री सक्रिय असतात. अशा वेळी जंगलातील अपरिचित वाटा, डोंगरकडे, ओढे आणि दुर्गम भागात संशोधकांना घेऊन जाण्याची जबाबदारी भरत पार पाडतात.

रात्री-अपरात्री संशोधकांसोबत जंगलात फिरताना परिसराची माहिती, प्राण्यांच्या हालचालींचे संकेत, संभाव्य अधिवास आणि सुरक्षिततेची काळजी याबाबत ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे संशोधकांसाठी भरत हे केवळ वाटाडे नसून प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनातील एक महत्त्वाचा सहकारी बनले आहेत.

गगनबावड्याच्या जैवविविधतेचा जवळून अभ्यास

गगनबावडा तालुका हा समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा परिसर आहे. तळये गाव आणि त्याच्या आसपासच्या जंगल-पर्वतीय भागाशी भरत यांचा लहानपणापासूनच जवळचा संबंध आहे. सर्प, विविध वन्यप्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्याबद्दल त्यांना विशेष माहिती आहे.

      त्यांचे शैक्षणिक शिक्षण M.Sc. Environment पर्यंत झाले असून पर्यावरण आणि जैवविविधतेविषयीची त्यांची आवड त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून अधिक समृद्ध केली आहे.

वडिल मारुती व्होवळे यांच्याकडून मिळाला जंगलाचा वारसा

भरत यांच्या जंगलप्रेमामागे त्यांचे वडील मारुती व्हावळे यांचा मोठा वाटा आहे. ते वनसेवक म्हणून कार्यरत आहेत. वडिलांसोबत जंगलात फिरताना भरत यांना परिसरातील वन्यजीव, वनस्पती आणि जंगलाचे बारकावे समजत गेले.

गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, वणवे विझवण्यासाठी जंगलात जाणे, वन्यजीवांच्या रेस्क्यूमध्ये सहभागी होणे अशा विविध अनुभवांमधून त्यांची जंगलाशी नाळ अधिक घट्ट होत गेली. पुढे हीच आवड त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली.

पर्यावरणपूरक पर्यटनालाही प्रोत्साहन

भरत व्हावळे हे ‘वनराज Expenditure’ या पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमाचे संस्थापक आहेत. त्यासोबतच ते साखर कारखान्यात STP ऑपरेटर म्हणून कार्यरत असून शेतीही करतात. नोकरी, व्यवसाय आणि शेती सांभाळतानाही संशोधकांना मदत करण्यासाठी ते वेळ देतात.

संशोधनाला मदत, तीही निःशुल्क

आजपर्यंत अनेक पीएच.डी. विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनासाठी भरत यांनी क्षेत्रीय पातळीवर मदत केली आहे. काही विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण झाले असून काहींचे संशोधन अद्याप सुरू आहे.

एखाद्या संशोधकाला एखादी विशिष्ट प्रजाती शोधायची असेल, तिच्या अधिवासापर्यंत पोहोचायचे असेल किंवा दुर्गम भागात प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असेल, तर भरत त्यांच्यासोबत उभे राहतात. त्यांच्या या मदतीमुळे संशोधकांचा वेळ वाचतो आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधन अधिक सुलभ होते.

‘संशोधन करणाऱ्यांना मदत करणे ही माझी जबाबदारी नाही, पण निसर्गाने मला जे शिकवले आहे ते इतरांच्या उपयोगी पडावे, एवढीच इच्छा आहे,’ हीच त्यांच्या कार्यामागची भावना असल्याचे त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे.

ज्ञानाची किंमत न घेता ज्ञानाची वाटणी

आजच्या काळात एखाद्या व्यक्तीचे स्थानिक ज्ञान हे अनेकदा आर्थिक व्यवहाराचा भाग बनते. मात्र भरत यांचा मार्ग वेगळा आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ मैत्री आणि संशोधनाला हातभार लागावा या भावनेतून ते मोफत मदत करतात. त्यांच्यासाठी संशोधकांना मदत करणे हा व्यवसाय नाही, तर निसर्गाने दिलेल्या ज्ञानाची पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे.

गगनबावड्याच्या जंगलातील एखादी दुर्गम वाट, रात्रीच्या अंधारात शोधायचा एखादा कीटक, एखाद्या झाडाच्या सावलीत लपलेली वनस्पती, नदीच्या उगमाकडे जाणारी कठीण पायवाट किंवा एखाद्या विशिष्ट प्रजातीचा अधिवास—या सगळ्यांचा शोध घेताना अनेक संशोधकांच्या पाठीशी भरत व्हावळे शांतपणे उभे राहतात.

प्रा. डॉ. आसावरी जाधव, विभागप्रमुख, पर्यवरण शास्त्र, शिवाजी विद्यापीठ

भरत हा आमचा विद्यार्थी आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अगदी कष्टाने त्याने त्याची M.Sc पूर्ण केली. तेव्हाही तो सोबतच्या तसेच जुनिअर विद्यार्त्याना फिल्ड विझिट साठी घेऊन जायचा आणि आज सध्यघडीलाही तो आमच्या मदतीसाठी निशुल्क उभा असतो. विद्यापीठात असताना त्याने अनेक जीवांचे रेस्क़ु करून त्यांना जीवनदान दिले आहे. तो एक जन्मजात निसर्गाभ्यासक आहे.


संशोधन पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे भरत बद्दल मनोगत -

२. प्रा. डॉ. एस. एम गायकवाड, शिवाजी विद्यापीठ -

 गगनबावडा परिसराचा अचुक अभ्यास असणाऱ्या भरतने फील्ड वर्क मध्ये खुप मदत केली आहे. कोणता जीव कोणत्या ठिकाणी सापडेल याचा त्याला बराच अनुभव आहे. इको टुरिझम साठी भरत चांगले काम करत आहे.

३. डॉ. अमृत भोसले, संशोधक - ठाकरे वाइल्डलाइफ

कोल्हापूर जिल्ह्यातील गोगलगायी या संशोधनासाठी कोदे डॅम परिसर व वळताई देवी परिसर एक्सप्लोर करणे केवळ भरतमुळे शक्य झाले. या जैवविविधता पूर्ण भागाचा भरत खऱ्या अर्थाने अभ्यासु मार्गदर्शक आहे. माझ्या पूर्ण संशोधन करणाऱ्या बॅचला भरतची खुप मदत झाली आहे.

४. प्रा. डॉ. योगेश माने, पाटण, सातारा. –

माझ्या संशोधनात भरतचा सिंहाचा वाटा आहे. माझे बरेचसे सँपल भरत ज्या भागात राहतो तेथेच मिळाले. तेथे रात्री सँपल कलेक्शन साठी जंगलात सोबत येणे, एव्हाना त्याला मिळालेले सँपल कीटक तो मला आणून द्यायचा. कोणतीही पूर्वमैत्री नसताना माझ्या राहण्याची व जेवणाची सोय भरतने कोणताही मोबदला न घेता केली. त्याचा मी जन्मभर ऋणी असेन.

५. प्रा. डॉ. गोपाळ राऊत, बार्शी, सोलापूर

शिवाजी विद्यापीठात इतर मित्रांकडून भरतसोबत ओळख झाली. माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गवळण किड्यांची जैवविविधता या संशोधनात भरतची खुप मदत झाली. कारण संशोधनातले बरेचसे नमुने भरतच्या गावाशेजारीच मिळाले ते शोधण्यात त्याची फार मदत झाली. त्याला मिळालेले अनेक सँपल त्याने स्वतः विद्यापीठात आणून दिलेत. सोबतच आमच्या राहण्या खाण्याची सोयही त्याने केली होती.

६. प्रा. डॉ. रुपेश यादव, मुंबई

मत्स्य प्रजाती संशोधनासारख्या किचकट विषयात भागातील प्रजाती कलेक्शन मध्ये भरतने खुप सहकार्य केले. कोणताही मोबदला न घेता पडेल ती मदत करणाऱ्या भरतला खरच सलाम आहे.

संशोधन चालू असलेले विद्यार्थ्यांचे मनोगत 

1. गणेश मासेडा, पालघर

माझे संशोधन कुंभी कासारी नदीवर सुरू आहे. त्या नदीचा उगम व कुंभी कासारी नदीचा संगम जो एकदम अडचणीच्या भागात आहे तो भरत दादामुळे सहज मिळाला. माझ्या संशोधनासाठी लागणारी इत्यंभूत माहिती दादाने मला दिली, ज्याचा खूप फायदा झाला आहे. अजूनही मी तेथे जाण्याआधी भरत दादाला फोन करूनच जातो, त्याने एकदाही मला टाळाटाळ केली नाहीये.

2. सोबियानाज मोमिन, ईश्वरपूर, सांगली

फील्ड वर्कसाठी भरतची खुप मदत होते. खुप सुरक्षित वाटते त्याच्यासोबत, तेथे गेल्यावर त्याच्या घरीच राहते. त्याच्या घरचेही त्याच्याइतकेच प्रेमळ आहेत, घरच्या मुलीप्रमाणे वागवतात मला.कोल्हापूर जिल्ह्यातील नोंदीसाठी भरतचा मोठा वाटा असेल.

3. मयूर जाधव, कोल्हापूर

जैवविविधतेने समृद्ध अशा गगनबावडा मध्ये माझ्या संशोधनातील अनेक ऑर्किड वनस्पती शोधण्यासाठी भरतचा मोलाचा वाटा आहे. भरतसोबतच त्याचा भाऊ समाधान व्होवळे ची देखील खुप मदत होते. त्याचं पूर्ण कुटुंबच मदतीसाठी नेहमी तत्पर असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा