Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित व कौशल्य पूरक शिक्षणावर भर : आमदार प्रा.जयंत आसगावकर


 कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आमदार जयंत आसगावकर, अधिष्ठाता  प्रा.डॉ. महादेव देशमुख  व चेअरमन जयवंत इंगळे व प्राचार्य डॉ. आर आर कुंभार 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोपार्डे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले असून, बदलत्या शैक्षणिक परिस्थितीनुसार शिक्षकांनीही नवीन तंत्रज्ञान व अध्यापन कौशल्य आत्मसात करून अध्यापन अधिक प्रभावी करावे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.

     स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी बी.ए. भाग-३, सेमिस्टर-५ अर्थशास्त्राच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षकांच्या वाढलेल्या कार्यभाराचा पुरेसा विचार झालेला नसल्याचे नमूद करून, या संदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

      कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषक म्हणून मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून त्याचा अध्यापन प्रक्रियेत प्रभावीपणे समावेश करावा आणि विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या व परिणामकारक पद्धतीने समजावून सांगावा, असे त्यांनी सांगितले.

     अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन  प्रा. डॉ. जयवंत इंगळे यांनी शिक्षकांनी सातत्याने आपली अध्ययन क्षमता वृद्धिंगत करून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.


    कार्यशाळेत  प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.अनिल सत्रे,प्रा. डॉ. सचिन सरदेसाई, प्रा.डॉ.प्रशांत फडणीस,प्रा. डॉ. मनोहर कोरे,प्रा. डॉ.मोहन सदामते,प्रा. डॉ. प्रभाकर माने व प्रा.डॉ.संदीप जाधव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

       कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. दादासाहेब माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील व योगिता कोळी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अस्लम अत्तार यांनी मानले. या कार्यशाळेबाबत विविध महाविद्यालयातून आलेल्या प्राध्यापकाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावेळी विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा