Breaking

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

कर्मवीर भाऊराव पाटील हे महात्मा फुले व छत्रपती शाहू विचारांचे खरे वारसदार : प्रा. डॉ. एन. पी. सावंत


 कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त मार्गदर्शन करतानाप्रा. डॉ. एन. पी. सावंत, प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले व प्रा. डॉ. टी. जी. घाटगे 


 प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक 


जयसिंगपूर : कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेणारे महान समाजसुधारक होते. त्यांनी आयुष्यभर वंचित, दलित आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजच्या शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. एन. पी. सावंत यांनी केले.ते जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर च्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ वी  जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

        कर्मवीर अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकताना प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने भविष्य घडविणारे कर्मवीर अण्णा हे एक व्यक्तिरूपी विद्यापीठ होते. त्यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आज आशिया खंडातील अग्रगण्य आणि मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.

          कर्मवीर अण्णांच्या मानवतावादी आणि कृतिशील विचारांचा विशेष उल्लेख करत त्यांनी महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह विविध महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन कर्मवीर अण्णांनी आपले शैक्षणिक व सामाजिक कार्य व्यापक केले, असे सांगितले.

       अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

      कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नॅक समन्वयक प्रा. डॉ. टी. जी. घाटगे यांनी केले. प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा