![]() |
| कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अधिष्ठाता प्रा.डॉ. एम.एस.देशमुख, अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. आर व्ही. कुपवाडे व अन्य मान्यवर |
*कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरील कार्यशाळा संपन्न*
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची सखोल माहिती प्राध्यापकांना व्हावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन अभ्यासक्रमावरील कार्यशाळा गुरुवारी (दि. २४) उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत IKS, VEC, SEC, VSEC, OJT, FP आणि RP या अभ्यासक्रम घटकांच्या स्वरूपासह त्यांची अंमलबजावणी, अध्यापन पद्धती व विद्यार्थ्यांना होणारे शैक्षणिक लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
उद्घाटन सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) एम. एस. देशमुख यांनी बीजभाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची अंमलबजावणी, विद्यापीठाची भूमिका तसेच क्रेडिट सिस्टीम, कौशल्य आधारित आणि बहुविद्याशाखीय शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला दिले जाणारे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. आर. व्ही. कुपवाडे होते.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे (पलूस) यांनी भारतीय ज्ञानपरंपरेच्या समृद्ध वारसावर मार्गदर्शन करून त्याचा आधुनिक अभ्यासक्रमाशी असलेला संबंध स्पष्ट केला.
तिसऱ्या सत्रात प्रो. डॉ. विकास मिणचेकर यांनी क्षेत्रीय प्रकल्प व प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन केले जाणारे संशोधन यांचे स्वरूप आणि कार्यपद्धती स्पष्ट केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. यशवंत चव्हाण, मराठी विभागप्रमुख, सहकारभूषण डॉ. एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड होते.चौथ्या सत्रात प्रा. डॉ. मनोहर कोरे, विलिंग्डन कॉलेज, सांगली यांनी मूल्याधारित व कौशल्याधारित शिक्षणावर मार्गदर्शन केले.
डॉ. पी. एन. चौगुले व डॉ. पी. एन. गोरे, उपप्राचार्य यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा