![]() |
| शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा युवा महोत्सव जयसिंगपूर कॉलेजमध्ये |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा एकदिवसीय जिल्हास्तरीय युवा महोत्सव मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न ८६ महाविद्यालयांमधील सुमारे १,५२० विद्यार्थी कलाकार सहभागी होणार आहेत.
युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या विविध वैयक्तिक व सांघिक कला प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये लोकनृत्य, लोककला, मूकनाट्य, लघुनाटिका, लोकसंगीत, एकल लोकवाद्य वादन, वादविवाद, मराठी, हिंदी व इंग्रजी वक्तृत्व, पथनाट्य, प्रश्नमंजुषा, एकांकिका, सुगम गायन, भारतीय समूहगीत आणि एकपात्री अभिनय आदी स्पर्धांचा समावेश आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. घाणे , शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव संयोजन समितीचे पदाधिकारी व सदस्य, कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. आर. एच. अतिग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे राहणार असून सचिव डॉ. महावीर अक्कोळे, स्थानिक संयोजन समितीचे प्रमुख प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, स्थानिक संयोजन सचिव प्रा. डॉ. संदीप तापकीर तसेच संयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या वर्षीच्या ४६ व्या युवा महोत्सवाचे कोल्हापूर जिल्हास्तरीय यजमानपद जयसिंगपूर कॉलेजला मिळाले आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा