Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२६

*जयसिंगपूर महाविद्यालयास ‘फारुक मेहतर नैसर्गिक वारसा पुरस्कार’*


 फारूक मेहत्तर नैसर्गिक वारसा पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, डॉ. सचिन पाटील, प्रा. डॉ. संदीप साबळे व अन्य मान्यवर


बटरफ्लाय गार्डनमधील जैवविविधता संवर्धनाच्या कार्याची दखल


प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक 


कोल्हापूर, दि. १ : जयसिंगपूर महाविद्यालयाच्या परिसरात विकसित करण्यात आलेल्या बटरफ्लाय गार्डनच्या माध्यमातून फुलपाखरू संवर्धन, जैवविविधता जतन, अधिवास निर्मिती आणि पर्यावरण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जयसिंगपूर महाविद्यालयास ‘फारुक मेहतर नैसर्गिक वारसा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

         वन्यजीव सप्ताह २०२६ च्या उद्घाटनानिमित्त गुरुवारी (दि. १) राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्य वनसंरक्षक श्रीमती लक्ष्मी ए. आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.

          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, डॉ. सूरज उमडाळे आणि प्रा. डॉ. संदीप साबळे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य रमण कुलकर्णी तसेच राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

       जयसिंगपूर महाविद्यालयाच्या परिसरात विकसित केलेले बटरफ्लाय गार्डन हे फुलपाखरे तसेच अन्य परागीभवन करणाऱ्या जीवांसाठी महत्त्वपूर्ण अधिवास ठरत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हे मैदानी अध्ययन केंद्र म्हणूनही विकसित झाले आहे. फुलपाखरांचे निरीक्षण, जैवविविधता, यजमान वनस्पती, अधिवासाच्या गरजा, परागीभवन प्रक्रिया आणि संवर्धनाच्या विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळत आहे.

         महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण आणि जैवविविधता संवर्धन यांची प्रभावी सांगड घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्याबरोबरच महाविद्यालयीन परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये निसर्गाविषयी आस्था निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

        सदर पुरस्कार रमण कुलकर्णी  यांच्या नेतृत्वाखाली फारूक मेहतर निसर्ग वारसा पुरस्कार समिती यांच्याकडून देण्यात आले. पुरस्कार समिती सदस्य काका भिसे, अस्मिता कुलकर्णी, प्रा.  अमोल कुलकर्णी व प्रवीण देसाई उपस्थित होते. तसेच फारूक मेहतर यांचे वडील व कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते.

      या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सदस्य, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे आणि अधीक्षक संजय चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी त्यांनी प्राणीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले.

      कार्यक्रमाचे नियोजन न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा