![]() |
| याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, मा. अजय शिंदे, डॉ. मिलिंद काळे व डॉ. सुशील शिंदे |
नशामुक्त समाजनिर्मिती, शिस्त आणि राष्ट्रप्रेमासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा
*प्रा. डॉ. प्रभाकर माने :मुख्य संपादक*
छत्रपती संभाजीनगर : युवकांनी समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणत राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून नशामुक्त समाजनिर्मिती, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन व राज्य प्रजासत्ताक दिन संचलन पूर्वचाचणी निवड शिबिराच्या सांगता समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी अजय शिंदे, क्षेत्रीय अधिकारी, पुणे विभाग व एस.एल. ओ.डॉ. मिलिंद काळे उपस्थित होते.
डॉ. वक्ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांना समाजसेवेची दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा. राष्ट्रसेवा ही केवळ संकल्पना नसून ती प्रत्येक युवकाने आपल्या जीवनात आचरणात आणण्याची जबाबदारी आहे. समाजहिताच्या कार्यातूनच जीवनाचे खरे सार्थक साधता येते.
एस. एल.ओ.डॉ.मिलिंद काळे यांनी शिबिराच्या उत्तम नियोजन व आयोजनाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून प्रत्यक्ष सामाजिक कार्याला महत्त्व द्यावे. केवळ रील तयार करण्यापेक्षा समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिस्त, सांस्कृतिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य व्हावे.
अजय शिंदे( क्षत्रिय अधिकारी) यांनी संचलनासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि समन्वय विकसित होतो. सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून पथकाची कामगिरी अधिक प्रभावी बनते, असे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या पथकाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे अशी आशा व्यक्त केली.
डॉ.सुशील शिंदे यांनी ९o विद्यार्थ्यांच्या सहभागाचा उल्लेख करत सात राज्यांतील पथकांसोबत होणाऱ्या स्पर्धांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि संघभावना यांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुभव विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठीही उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले. शिबिराच्या अंतिम दिवशी जनजागरण रॅलीच्या माध्यमातून प्रबोधनाचा काम करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व विद्यापीठातील संघनायक यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी व कुलसचिव डॉ. संजय कवडे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी स्थानिक सर्व समिती प्रमुख व सदस्यांचे सहकार्य लाभले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. खाडे व सूत्रसंचालन डॉ. कळलावे यांनी केले.
दि. १२ ते १४ या तीन दिवस चाललेल्या या निवड शिबिरामुळे विद्यार्थ्यांना संचलनातील शिस्त, नेतृत्व, सांघिक समन्वय, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अनुभवता आले. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव रुजविण्याचा संदेश या सांगता समारंभातून देण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा