Breaking

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणार कृत्रिम बुद्धिमत्ता : प्रा. डॉ. रोहिणी देशपांडे


 मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. रोहिणी देशपांडे, संस्थेचे संचालक अशोक शिरगुप्पे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे  व उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनात भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) महत्त्वाची भूमिका बजावणार असून, अर्थव्यवस्थेच्या बदलाचा ती प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे, असे प्रतिपादन मथुबाई गरवारे कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रोहिणी देशपांडे यांनी केले.

        शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) आणि जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलते स्वरूप’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. संस्थेचे सदस्य अशोक शिरगुप्पे व उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

      प्रा. डॉ. देशपांडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक अर्थात सेवा क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा विविध अंगांनी ऊहापोह केला. बदलती जागतिक परिस्थिती स्वीकारून प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य व प्रभावी वापर केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर आपले अग्रस्थान अधिक बळकट करता येईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षण क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

        यावेळी अशोक शिरगुप्पे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असला तरी मानवी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व कायम राहणार असल्याचे अधोरेखित केले.

      अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरत मांजरे म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे उद्योग, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत मोठे परिवर्तन घडत आहे. बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील संधींचा वेध घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे.’’

    यावेळी प्रा. स्वाती बस्तवाडे, प्रा. बाळगोंडा पाटील, प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. स्नेहल रोटे, प्रा. गणेश कुरले यांच्यासह ज्युनिअर व सिनिअर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विश्रांती चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. वंदना देवकर यांनी आभार मानले. प्रा. रफिया रांगोळे यांनी सूत्रसंचालन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा