![]() |
| प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, प्राचार्य प्रा. डॉ. आर. आर.जाधव, कार्यवाह प्रा. डॉ. संजय धोंडे व प्रा. डॉ. नितीन पाटील व मान्यवर |
कराड : विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, ज्ञान, कौशल्य, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर युवकांनी देशाच्या विकासप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख तथा के. बी. पी. विद्यापीठ, सातारा येथील मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी केले.
ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथील अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद, कोल्हापूर (सुयेक) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारताचे लक्ष्य आणि आजचा युवक’या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे कार्यवाह व खजिनदार डॉ. संजय धोंडे उपस्थित होते. त्यांनी परिषदेच्या कार्याची माहिती देताना, समाजातील विविध समस्यांवर विचारमंथन करून त्यावर उपाययोजना सुचविणे, तसेच स्थानिक आर्थिक प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणे, हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्राचार्य प्रा.डॉ. आर. आर. जाधव अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, युवकांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापुरते मर्यादित न राहता रोजगारनिर्मिती करणारे, जबाबदार आणि आत्मनिर्भर नागरिक बनावे, असे आवाहन केले. युवकांमध्ये विकासाभिमुख विचार, कौशल्ये आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी एस.जी. एम कॉलेज कराड येथील प्रा. डॉ. ए. के. पाटील आणि प्रा. डॉ.शशिकांत गाडगीळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. ए. बी. मुळीक यांनी करून दिला. डॉ. जे. यू. दीक्षित यांनी आभार मानले, तर डॉ.अमरवेली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यशाळेत विविध महाविद्यालयांतील व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा